Ticker

6/recent/ticker-posts

युरिया शेतीतील उपयोग

युरिया नत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती करते. प्रकाशसंश्‍लेषणाद्वारे पिकाचे अन्न बनवण्यास मदत करते. यामुळे पिकाची झपाट्याने कायिक वाढ होते, चांगली फुले व फळे लागतात. पिकामध्ये प्रथिने तयार होण्यासाठी नत्र अावश्‍यक आहे.


युरियामध्ये ४६ टक्के नत्र असते. युरियामधील ४६ टक्के नत्र पिकाला किती मिळते हे वापरण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. ओल्या जमिनीत युरिया दिल्यानंतर त्याची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन अमोनियम तयार होतो. युरिया जर पारंपरिक पद्धतीने शेतात फेकून दिला, तर ही अभिक्रिया मातीवर म्हणजेच उघड्यावर होते. अमोनियमचे अमोनिया गॅसमध्ये रुपांतर होऊन तो लगेच हवेत उडून जातो. म्हणून युरिया नेहमी जमिनीत पेरून द्यावा.


अमोनियम हे अस्थिर संयुग असते. जमिनीत नैसर्गिकरीत्या आढळणारा नायट्रोझोमोनस जिवाणूच्या मदतीने तो नाइट्राईटमध्ये रुपांतरीत होतो. लगेच नायट्रोबॅक्‍टर जिवाणूच्या मदतीने नाइट्रेट तयार होते.


भात पीक सोडून इतर सर्व पिके नत्र फक्त नाइट्रेट स्वरुपातच घेतात. याचा अर्थ असा, की पीक अन्न म्हणून सरळ युरिया घेत नाही, तर नाइट्रेट घेते. या रुपांतरासाठी जमीन जिवंत असायला हवी.


जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर पाहिजे. त्यामुळे जमिनीत हवा आणि ओलाव्याचे योग्य प्रमाण टिकून राहते. उपयुक्त जिवाणू, बुरशी व इतर जिवांची चांगली वाढ होते. यासाठी रासायनिक खताबरोबर चांगले कुजलेले शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खते दरवर्षी जमिनीत मिसळावीत.


विघटित युरिया वाया जाण्याची कारणे


युरियाचे अमोनिफिकेशन होताना हवेशी संपर्क आला, की अमोनिया वायू तयार होऊन तो हवेत उडून जातो. या क्रियेला होलाटीलाईझेशन असे म्हणतात. हे नुकसान सर्वांत जास्त म्हणजे दिलेल्या युरियाच्या जवळपास ५८ ते ६० टक्के असते.


जेव्हा युरिया नाइट्रेट स्वरुपात येतो, तेव्हा पिकाची मुळे त्याला कोशिकांमध्ये शोषून घेतात. परंतु, जमिनीत जर ओल खूप जास्त असेल तर चल नाइट्रेट घटक मुळांपासून दूर खोल जमिनीत पाण्याबरोबर झिरपून जातो. याचे प्रमाण २० ते २२ टक्के आहे.


ज्या जमिनीला पाट पद्धतीने पाणी दिले जाते, तिथे चिखल तयार होतो. मातीतील हवेची जागा पाणी घेते. मुळांची अन्न व पाणी घेण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन ही सर्वोत्तम पद्धत आहे.


पिकांच्या मुळांबरोबर नत्रासाठी स्पर्धा करणारे काही जिवाणू जमिनीत राहतात. आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी जिवाणू नाइट्रेट शोषून घेऊन सेंद्रिय स्वरुपात रुपांतरीत करतात. पीक हे नत्र घेऊ शकत नाही याला इंमोबिलायझेशन म्हणतात. युरियामधील फक्त ३० ते ३५ टक्के नत्र पिकाला मिळते.


दाणेदार युरिया फायदेशीर


विशेष तंत्रज्ञान वापरून दाणेदार युरिया बनवितात. याचा दाणा टणक, २ ते ३ मिलीमीटर जाडीचा, पांढराशुभ्र, पावडरविरहीत असतो. प्रत्येक दाण्यावर फॉर्माल्डीहाइड नावाच्या मेणासारख्या घटकाचा लेप केलेला असतो. पारंपारिक युरियापेक्षा हा युरिया पिकाला कमी लागतो.


जमिनीत जास्तीचा ओलावा असला तरी हा युरिया हळूहळू विरघळतो. बारीक युरिया जास्तीत जास्त ७ ते ८ तासांत विरघळतो, तर जाड युरिया ३६ ते ३८ तास उपलब्ध असतो. जास्त वेळ उपलब्धता म्हणजे पिकाला नत्र शोषण्यासाठी जास्त कालावधी. यामुळे जाड युरियाची कार्यक्षमता तिपटीने वाढते.


जाड युरियाचा जेवढा भाग मातीच्या संपर्कात येतो, तेवढ्याच भागावरील फॉर्माल्डीहाइड मेणाचा लेप विरघळतो. त्यातून नत्र बाहेर पडते. जो भाग मातीच्या संपर्कात येत नाही, त्यावरील लेप तसाच राहतो, नत्र हवेत उडत नाही. त्यामुळे मोठे नुकसान टाळले जाते.


जाड दाणा पेरणीसाठी सोपा आहे. त्यात अजिबात पावडर नसते. त्यामुळे उभ्या पिकाला वापरताना पानावर पडून पाने जळण्याचा धोका नसतो.


युरियाचे नुकसान टाळून पिकाला नत्राची उपलब्धता वाढते. दिलेल्या खताचा पुरेपूर उपयोग होतो.


संतुलित खत मात्रा द्या


पिकांना संतुलित खत मात्रा द्यावी. म्हणजे पिकाची वाढीची अवस्था लक्षात घेऊन, सोळा अन्नघटकपैकी आवश्‍यक अन्नघटक योग्यप्रकारे, योग्य मात्रेत पिकाच्या मुळांच्या कक्षेत द्यावेत.


बागायती क्षेत्रातील पिकांना ठिबकद्वारे आणि कोरडवाहू क्षेत्रातील पिकांना फवारणीद्वारे शिफारशीत मात्रेमध्ये विद्राव्य खते द्यावीत. ८५ ते ९० टक्के विद्राव्य खते पिकाला लागू होतात, ही खते कमी प्रमाणात लागतात. ही खते हाताळणीस सोपे आणि किफायतशीर आहेत. १७ः४४ः००, १८ः१८ः१८, ०ः०ः५०, १२ः६१ः०, ०ः५२ः३४, १३ः०ः४५, १९ः१९ः१९ असे विद्राव्य खतांचे प्रकार उपलब्ध आहेत.

Source :

अशोक साकळे, ७७९८०९१२८८

(लेखक इफको मध्ये क्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या