Ticker

6/recent/ticker-posts

नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता आणि त्यांचा योग्य वापर

नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता आणि त्यांचा योग्य वापर
रासायनिक खतांच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ दिसून आलेली आहे. पिकास लागणाऱ्या निरनिराळ्या सोळा अन्नद्रव्यांपैकी नत्र हे पिकास सर्वांत जास्त प्रमाणात लागत असणारे अन्नद्रव्य आहे. आता सर्वच शेतकऱ्यांना नत्राचा पीक- उत्पादनावर होणारा परिणाम माहीत झालेला आहे. युरियासारखे नत्रयुक्त खत अत्यंत शेतकरीप्रिय झालेले आहे. पिकास दिलेल्या रासायनिक खतांपैकी अर्ध्यापेक्षाही जास्त नत्र जमिनीतून वाया जाते. प्रयोगाअंती असे दिसून आले आहे की, पिकांना दिलेल्या नत्र खतांपैकी ४० ते ६० टक्केच नत्र शोषण करतात आणि बाकीचे नत्र अनेक मार्गाने जमिनीतून वाया जाते. या वाया जाणाऱ्या नत्रात बाष्परूपी अमोनिया १० १५ टक्के, अनत्रीकरण ५ ते १० टक्के, चिकण मातीच्या कणाबरोबर स्थिरीकरण ५ टक्के आणि पाण्याबरोबर नायट्रेट नत्र झिरपून जाणे, यात २०-२५ टक्के नत्राचा समावेश असतो. हे वाया जाणारे नत्र टाळण्यासाठी व दिलेल्या खताची उपयुक्तता वाढविण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून काही प्रमाणात यश मिळवले आहे.

नत्रयुक्त खतांची उपयुक्तता वाढविण्यासाठी जमीन व पिकानुसार खतांची निवड, माती परीक्षणानुसार खतांचा वापर, खते देण्याच्या वेळा व योग्य पद्धती, निरनिराळ्या अन्नद्रव्यांचा समतोल वापर, ओलिताचे व्यवस्थापन या सर्वांची सांगड घालणे आवश्यक आहे. तसेच जमिनीतून होणाऱ्या नत्राचा अपव्यय टाळणे महत्त्वाचे ठरते.

नत्रयुक्त खतांची जमीन व पिकानुसार निवड

अनेक शेतकरी नत्रयुक्त खते देताना जमीन व पिकांचा विचार न करता बाजारात उपलब्ध असणारी खते विकत घेतात. परंतु तेवढ्याच खर्चात किंबहुना त्यापेक्षा कमी खर्चातही आपली जमीन व घ्यावयाचे पीक यानुसार खत निवडले तर त्यापासून जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. तसेच ते खत जास्त किफायतशीर वापरले जाऊन पिकांचे उत्पादनही अधिक मिळते. कारण पिकांची नत्र शोषून घेण्याची क्षमता ही नत्रयुक्त खतांच्या प्रकारावर व नत्राचे स्वरूपावर [NO-N व NH, - N] बहुधा अवलंबून असते व प्रत्येक पिकाच्या नत्र शोषून घेण्याच्या क्षमतेत फरक असतो. बाजारात निरनिराळ्या प्रकारची नत्रयुक्त खते मिळतात.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या