Ticker

6/recent/ticker-posts

कांदा

कांद्याची लागवड मध्यम, भारी, कसदार आणि भुसभुशीत जमिनीत करावी. पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या आणि सेंद्रिय पदार्थाचे भरपूर प्रमाण असणाऱ्या जमिनीत कांद्याचे पीक चांगले येते.

सरी-वरंब्यामध्ये/सपाट वाफ्यांमध्ये रोपांची पुनर्लागवड  

१) रोपे गादीवाफ्यांवर तयार करून त्यांची पुनर्लागवड करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. रोपे सपाट वाफ्यात किंवा सरी वरंब्यावर लावली जातात. 
२) सपाट वाफ्यातील लागवड सरी वरंब्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरते. कारण सपाट वाफ्यांमध्ये रोपांची संख्या सरी वरंब्यापेक्षा जास्त बसते. रोपांच्या वाढीला चांगला वाव मिळतो. पाणी सारखे बसते, खुरपणी आणि वरखतांची मात्रा देणे इत्यादी कामे सोपी होतात. लहान किंवा चिंगळी कांद्याचे प्रमाण सरी-वरंब्यावर केलेल्या कांद्याच्या तुलनेत कमी राहते. 
३) सरी-वरंब्यामध्ये मध्यावर ४५ बाय १० सें.मी. रोपे लागवड करावी. सरीच्या वरच्या भागात लावलेला कांदा चांगला पोसतो, तर तळातील कांदा लहान राहतो. खरिपात ज्या शेतामध्ये पाण्याचा निचरा होत नाही, अशा जमिनीत मात्र लागवड सरी-वरंब्यावर करावी. 
४) जमिनीचा उतार बघून २ मीटर रुंद आणि ३ ते ५ मीटर लांबीचे वाफे तयार करावेत. जमीन सपाट असेल तर वाफ्यांची लांबी आणखी वाढवता येते. सपाट वाफ्यामध्ये लागवड नेहमी कोरड्या जमिनीत करावी आणि नंतर पाणी द्यावे. सरी वरंब्यात वाफ्यांना पाणी दिल्यानंतर लागवड करावी. गादीवाफ्यावर लागवड करून कांद्याचे पीक घेता येते. लागवडीपूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.

ठिबक सिंचनावरील लागवड

१) कांद्याची लागवड आपल्याकडे साधारणपणे सपाट वाफा पद्धतीने अथवा सरी वरंबा पद्धतीवर केली जाते. कांद्याची उत्पादकता कमी असण्याच्या प्रमुख कारणांमध्ये पाणी व्यवस्थापनाची अयोग्य पद्धत, सुधारित जातीचा अभाव, असंतुलित पोषण, एकरी रोपांची संख्या पीक संरक्षणाकडील दुर्लक्ष ही आहेत. या सर्व बाबींचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून कांद्याचे आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीने एकरी २०० क्विंटल एवढे उत्पादन मिळू शकते. 
२) ठिबक सिंचनावर कांदा लागवड करावयाची झाल्यास त्यासाठी १५० ते १८० सें.मी. रुंदीचे गादेवाफे तयार करावे लागतात. एका वाफ्यावर दोन लॅटरल ६० सें.मी. अंतरावर पसरवून घ्याव्यात. दोन ड्रीपमध्ये ६० सें.मी. अंतर ठेवावे. वाफ्यावर ठिबक संच चालवून वाफसा येईपर्यंत पाणी द्यावे आणि वाफसा आल्यावर १० बाय १० सें.मी. अंतरावर लागवड करावी.

लागवड हंगाम

लागवड हंगाम ---- बी पेरणी वेळ ---- रोपांची पूर्ण लागवड ---- कांदा काढणी ---- योग्य जाती 
खरीप किंवा पोळ कांदा ---- मे ते जून ---- जुलै ते ऑगस्ट ---- ऑक्टोबर ते डिसेंबर ---- बसवंत ७८०, एन ५३ अर्का कल्याण, फुले समर्थ, ॲग्रीफाऊंड डार्क रेड 
रांगडा किंवा रब्बी (हवळा) कांदा ---- ऑगस्ट ते सप्टेंबर ---- ऑक्टोबर ते नोव्हेंबर ---- जानेवारी ते मार्च ---- फुले समर्थ, बसवंत ७८०, एन ५३ अर्का कल्याण 
उन्हाळी किंवा गरवा कांदा ---- ऑक्टोबर ते नोव्हेंबर ---- डिसेंबर ते जानेवारी ---- एप्रिल ते मे ---- पुसा रेड, अर्का प्रगती, अर्का निकेतन, ॲग्रीफाऊंड लाईट रेड

खत व्यवस्थापन 

नत्र, स्फुरद, पालाश वेगवेगळ्या खतांमधून देण्याची मात्रा (१५०-१५०-५० किलो/ हेक्टरी) 
नत्र ---- स्फुरद ---- पालाश ---- खतांची नावे 
१५० ---- ०० ---- ०० ---- युरिया ३३२ कि./हे. 
०० ---- ५० ---- ०० ---- सिंगल सुपर फॉस्फेट ३१२ कि./हे. 
०० ---- ०० ---- ५० ---- म्युरेट ऑफ पोटॅश ८३ कि./हे. 

नत्र ---- स्फुरद ---- पालाश 
१९.५ ---- ५० ---- ०० ---- डीएपी १०९ कि./हे. 
१३०.५ ---- ०० ---- ०० ---- युरिया २८० कि./हे. 
०० ---- ०० ---- ५० ---- म्युरेट ऑफ पोटॅश ८३ कि./हे. 

नत्र ---- स्फुरद ---- पालाश 
५० ---- ५० ---- ५० ---- १५ः१५ः१५ ३३३ कि./हे. 
१०० ---- ०० ---- ०० ---- युरिया २१५ कि./हे. 

नत्र ---- स्फुरद ---- पालाश 
२० ---- ५० ---- ५० ---- १०ः२६ः२६ १९२ कि./हे. 
१३० ---- ०० ---- ०० ---- युरिया २८० कि./हे. 

नत्र ---- स्फुरद ---- पालाश 
५० ---- ५० ---- ०० ---- २३ः२३ः००, २१७ कि./हे. 
१०० ---- ०० ---- ०० ---- २१५ कि./हे. युरिया 
०० ---- ०० ---- ५० ---- ८३ कि./हे. पोटॅश 
टीप - रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणानुसार करावा.

कांदा पिकावर विद्राव्य स्वरूपात फवारणीची शिफारस

अ.क्र. ---- खत प्रकार ---- फवारणीची वेळ ---- फवारणीची मात्रा/ हे./ २०० लि. पाणी 
१) ---- १९ः१९ः१९ ---- लागवडीनंतर १५ दिवसांनी ---- ०.५ - १.० किलो 
२) ---- कॅल्शिअम नायट्रेट ---- लागवडीनंतर २५ दिवसांनी ---- १ किलो 
३) ---- १०ः३६ः१० किंवा ००ः५२ः३४ ---- लागवडीनंतर ३० दिवसांनी ---- ०.५ - १.० किलो 
४) ---- कॅल्शिअम नायट्रेट ---- लागवडीनंतर ४० दिवसांनी ---- १-२ किलो 
५) ---- कॅल्शिअम नायट्रेट ---- लागवडीनंतर ५० दिवसांनी ---- १-२ किलो 

टीप -तज्ज्ञांच्या सल्ल्याने विद्राव्य खताचा वापर करावा. 

संपर्क - किरण जाधव - ७५८८००१४५२ 
( लेखक कृषी विज्ञान केंद्र, जळगाव येथे कार्यरत आहेत)
इतर पोस्ट:माहिती संदर्भ : अॅग्रोवन

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. सर मला कांदा खत व विद्राव्य खत फवारणी व्यवस्थापन माहिती मिळावी

    उत्तर द्याहटवा

Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro