Ticker

6/recent/ticker-posts

शेवगा लागवड कशी करावी माहिती

शेवगा लागवड माहिती

शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते.
 -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे
शेवगा लागवड

हवामान व जमीन :
  • शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो.
  • शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो.
सुधारित जाती : 
  • कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत.
  • या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात.
  • पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो.
लागवड :
  •  पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्डा भरून घ्यावा.
  • लागवड करताना दोन झाडांतील व ओळींतील अंतर ३ मीटर ठेवावे. शेताच्या बांधावर लागवडीसाठी ३ मीटर अंतर ठेवावे.



लागवडीचा कालावधी :
  •  जून ते जुलैमध्ये पावसानंतर वातावरणात अनुकूल बदल होतो. हवेतील आर्द्रता वाढते. अशी हवा रोपे रुजण्यास अनुकूल असते. तेव्हा याच वेळी लागवड करावी.
  • फाटे कलम अथवा रोपे लावल्यावर त्याच्या जवळील माती पायाने चांगली दाबावी व हातपाणी द्यावे. लागवडीनंतर ६ ते ७ महिने गरज पडेल तेव्हा पाणी देऊन किंवा ठिबक सींचनाने झाडे जगवावीत.
आंतरपीक :
  • आंबा, चिकू, लिंबू, जांभूळ, आवळा, चिंच व सीताफळ बागांमध्ये पहिले ५-६ वर्ष आंतरपीक म्हणून शेवगा घेता येतो.
  • शेवग्याची लागवड सलग पद्धतीने केल्यास त्यामध्ये खरिपात सोयाबीन, मूग, उडीद, हुलगा अशा कडधान्यांची व रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड केल्यास जमिनीची सुपीकता वाढून आंतरपिकाचे उत्पादन मिळते.
  • मध्यम ते भारी जमिनीत शेवग्याची लागवड करावयाची असल्यास व पाण्याची उपलब्धता असेल तर नगदी पिकेसुद्धा घेणे फायद्याचे ठरते.


लागवडीनंतर घ्यावयाची काळजी :
  • झाडाची आळी खुरपून स्वच्छ करावी. तसेच दोन झाडांच्या ओळीत वखरणी करावी. म्हणजे तणांचा उपद्रव होणार नाही.
  • प्रत्येक झाडास १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ५० ग्रॅम स्फुरद ( ३१२ ग्रॅम सुपर फॉस्फेट) व ७५ किलो पालाश (१२० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे.
  • शेवग्याची झाडे झपाट्याने वाढणारे असल्यामुळे झाडांना आकार देणे आवश्यक आहे. व्यवस्थित आकार दिला नाही तर झाड उंच वाढते. त्यामुळे शेंगा काढणी अवघड जाते.

शेवग्याची छाटणी :
  • लागवडीनंतर साधारणपणे ३ ते ४ महिन्यांनंतर व झाडांची उंची ३ ते ४ फूट झाल्यानंतर वरून अर्धा ते एक फूट शेंडा छाटावा. त्यामुळे झाडांची उंची मर्यादित राहून शेंगा देणाऱ्या फांद्या ३ ते ४ फुटाच्या खाली आल्याने शेंगा काढणीस सोपे जाते.
  • लागवडीपासून ६ ते ७ महिन्यात शेंगा तोडणीस येतात. त्यानंतर ३ ते ४ महिने शेंगाचे उत्पादन मिळते.
  • एक पीक झाल्यानंतर पुन्हा झाडांची छाटणी करुन झाडास योग्य तो आकार द्यावा. त्यासाठी झाडाचा मुख्य बुंधा ३ ते ४ फूट ठेवून बाजूच्या फांद्या साधारणतः १ ते २ फूट ठेवाव्यात.

पीकसंरक्षण :
या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव फारसा दिसत नाही. परंतु, काही वेळा जून ते ऑगस्ट महिन्यात पानांची गळ होते. खोड व फांद्यांवर ठिपके किंवा चट्टे दिसतात. रोेपे मरतात. या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम (१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) किंवा बोर्डोमिश्रण (०.२५%) फवारावे.

काढणी व उत्पादन :
लागवडीपासून सुमारे ६ ते ७ महिन्यांनी शेंगा मिळू लागतात. पूर्ण वाढीच्या आणि ज्यांचा पीळ पूर्ण उलगडला आहे अशा शेंगा लांबीनुसार जुळवून घ्याव्यात. प्लॅस्टिक कागदाच्या गोणपाटात गुंडाळल्यास शेंगाचा तजेला जास्त काळ टिकून राहतो. एका वर्षानंतर दरवर्षी एका चांगल्या झाडापासून सुमारे २५ ते ५० किलो शेंगा मिळतात. 


Source:-
संपर्क - डॉ. सखेचंद अनारसे, ७५८८६०४१३०
(अखिल भारतीय वनशेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. नगर)

टिप्पणी पोस्ट करा

9 टिप्पण्या

  1. शेवगा छाटणी नोव्हेंबर महिन्यात केली तर चालेल का

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. शेवंगाची कोणती जात जास्त उत्पन्न देते

      हटवा
    2. भाग्या(KDM-1), पी.के.एम-१ (PKM-1) आणि पी.के.एम-२(PKM-2) हे वाण चांगले उत्पन्न देतात

      हटवा
  2. मे महिन्यात हलका पाऊस झाल्यानंतर लागवड करता येईल का?

    उत्तर द्याहटवा
  3. मागील जून जुलैमध्ये झाडे लावलीत. उत्तम वाढलुत पण आजछन शेंगा नाहीत. नियमीत पाणी घालतो.

    उत्तर द्याहटवा
  4. एक एकर क्षेत्रावर किती झाडांची लागवड करावी..?

    उत्तर द्याहटवा

Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro