Ticker

6/recent/ticker-posts

किड व्यवस्थापन व् किड माहिती

किड व्यवस्थापन
            बीटी कपाशीमुळे कपाशीच्या क्षेत्र आणि उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बोंडअळयासाठी फवारणी कमी झाली आहे. पण रस शोषण करणा­या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठीच्या किटकनाशकांच्या फवारणीच्या संख्येत आणि खर्चामध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे किटकनाशकाचा अतिरेकी वापर होय. यासाठी पिकाच्या टप्प्यानुसार आणि किडीनुसार किटकनाशकाची फवारणी आणि इतर पध्दतीचा अवलंब करून कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
रस शोषणा­या किडी व व्यवस्थापन


तुडतुडे
            या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवडयापासून सुरु होतो. सर्वात जास्त प्रादुर्भाव ऑगस्टचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबरचा दुसरा आठवडा या कालावधीत आढळून येतो. अधूनमधून होणारा हलकासा पाऊस आणि ढगाळ वातावरण या किडीच्या वाढीला पोषक आहे. याबरोबरच कपाशीची उशिरा पेरणी आणि नत्रयुक्त खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर या किडीच्या वाढीस मदत करतो. सद्यपरिस्थितीत बीटी कपाशीवर तुडतुडयांचा प्रादुर्भावाची तीव्रता खूप वाढली आहे. याचे प्रमुख कारण आहे, निओनिकोटीनॉईड गटातील किटकनाशकाचा (उदा. इमिडाक्लोप्रीड) अति वापर होय. तुडतुडयांमध्ये या किटकनाशकाबद्दल प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे.
            तुडतुडयाची प्रौढ व पिल्ले पानाच्या मागील बाजूने राहून रस शोषण करतात. त्यामुळे सुरुवातीला पानाच्या कडा पिवळसर पडतात, पाने आकसतात व नंतर कडा तपकिरी किंवा लालसर होतात. प्रादुर्भाव मोठया प्रमाणात असल्यास झाडाची संपूर्ण पाने तपकिरी होतात.
फुलकिडे
            फुलकिडे पावसाळयाच्या शेवटी आणि लांब उघाड पडली तर मोठया संख्येत वाढतात आणि सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात उग्र रूप धारण करतात. मागील 4-5 वर्षापासून फुलकिडयांचा प्रादुर्भाव बीटी कपाशीवर जास्त प्रमाणात वाढत आहे.
            प्रौढ फुलकिडे आणि पिल्ले कपाशीच्या पानामागील भाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेश शुष्क होतात. तो भाग प्रथम पांढुरका आणि नंतर तपकिरी होतो. त्यामुळे पाने व कळया आकसतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने कडक होऊन फाटतात.
पांढरी माशी
            पांढ­या माशीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयापासून सुरु होतो व नंतर नोव्हेंबर महिन्यात अधिकतम प्रादुर्भाव आढळून येतो. सध्या बीटी कपाशीवर पांढ­या माशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सुरुवातीच्या काळातील रासायनिक किटकनाशकांचा अतिरेकी वापर हे प्रमुख कारण आहे. यामुळे पांढ­या माशीचा कपाशीवर वारंवार पुर्नउद्रेक होत आहे.
            पांढ­या माशीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात. अशी पाने कोमेजतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने लालसर ढिसूळ होऊन शेवटी वाळतात. याशिवाय पिल्ले त्यांच्या शरिरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे संपूर्ण झाड चिकट व त्यावर बुरशी वाढून काळसर होते. त्यामुळे पानाच्या अन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊन झाडावर विपरित परिणाम होतो. त्याबरोबर काही विषाणूचा प्रसारसुध्दा या माशीमुळे होतो.
मावा
            मावा या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपवस्थेत आणि शेवटच्या अवस्थेत आढळतो. कोरडवाहू कपाशीवर सर्वसाधारणपणे जुलैच्या दुस­या आठवडयापासून सुरु होतो. सर्वात जास्त प्रादुर्भाव जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टचा दुसरा आठवडा आणि पिकाच्या शेवटी डिसेंबर-जानेवारी महिन्यात आढळून येतो. रिमझिम पाऊस आणि अधिक आर्द्रता या किडीच्या वाढीला पोषक असते. परंतु जोराचा पाऊस झाल्यास त्यांची संख्या कमी होते.
            माव्याची प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळया शेंडयावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात. अशी पाने आकसतात व मुरगळतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. याशिवाय माव्याने शरिरातून बाहेर टाकलेल्या चिकट गोड द्रवामुळे बुरशीची वाढ होऊन पाने काळसर होतात. पिकाच्या शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास कापसाची बोंडे चांगली उमलत नाहीत. तसेच काही विषाणूंचा प्रसार माव्यामार्फत केला जातो.
पिठया ढेकूण
            पिठया ढेकूण या नवीन किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. महाराष्ट्रात 2007 व 2008 मध्ये पिठया ढेकणाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झाला होता. सध्या ही कीड काही शेतामध्येच थोडया फार प्रमाणात आहे. ही कीड नियंत्रीत राहण्यामध्ये या किडीचे नैसर्गिक शत् डिग्री (उदा. प्रोम्युसिडी, अनॅसियस, अनॅगायरस) यांची महत्वाची भूमिका आहे.
            पिठया ढेकणाची प्रौढ व पिल्ले कपाशीची पाने, कोवळी शेंडे, पाते, फुले व बोंडे यातून रस शोषण करतात. त्यामुळे त्यांची वाढ होत नाही. हे ढेकूण त्यांच्या शरिरातून चिकट द्राव बाहेर टाकतात. कालांतराने त्यावर बुरशीची वाढ होते व त्याचा झाडावर विपरित परिणाम होतो. बोंडे फुटल्यानंतर रुईवर बुरशी वाढून प्रत खालावते.
बोंडअळ्या
            बीटी कपाशीमुळे बोंडअळयाचे नियंत्रण चांगल्याप्रकारे झाले आहे. पण मागील दोन वर्षापासून एक जनूक असलेल्या (बीजी-1) बीटी कपाशीच्या वाणावर शेंदरी आणि अमेरिकन बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.
अमेरिकन बोंडअळी
            ही बहूभक्षी कीड असून विविध पिकांना मोठया प्रमाणात नुकसान करते. बीटी कपाशीमुळे या किडीचे नियंत्रण झाले आहे. पण भविष्यात या किडीमध्ये बीटी बद्दल प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. अंडयातून बाहेर पडल्यानंतर अळी सुरुवातीस कोवळी पाने, कळया, पाते, फुले यावर उपजिविका करते. बोंडे आल्यानंतर त्यामध्ये तोंड खुपसून आतील भाग खाते. त्यामुळे लहान बोंडे, पात्या, फुले, कळया गळून पडतात किंवा झाडावरच पावसाच्या पाण्यामुळे सडतात. सततचे पावसाळी वातावरण, 75 टक्यापेक्षा जास्त हवेतील आर्द्रता, कमी सूर्यप्रकाश या बाबी या किडीच्या प्रादुर्भावास पोषक आहेत.
शेंदरी बोंडअळी
            शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवडयापासून बोंडामध्ये आढळून येतो. सध्या बीटी कपाशीवर विशेष करून एक जनुक असलेल्या वाणावर शेंदरी बोंडअळी आढळून येत आहे. उष्ण व ढगाळ हवामानात थोड पाऊस आल्यास अळीची वाढ झपाटयाने होते. अळी कळया, फुले किंवा बोंडे यांना बारीक छिद्र करून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. किडलेली पाते, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात. अळया बोंडामध्ये आत शिरल्यानंतर वरून तिचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही. अळी बियांना छिद्र करून सरकी खाते. त्यामुळे रुईची प्रत खराब होते आणि सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते.
ठिपक्याची बोंड अळी
            या किडीची अळी प्रथम झाडाच्या शेंडयात शिरुन आतील भाग खाते, त्यामुळे शेंडे सुकून जातात. पीक फुलावर येताच अळी कळयात शिरुन व नंतर बोंडात शिरुन त्यांचे नुकसान करते. कीड लागलेल्या कळया व बोंडे गळून पडतात. झाडावर राहिलेली बोंडे लवकर फुटतात व त्यापासून कमी प्रतीचा कापूस मिळतो.
इतर किडी
तंबाखुवरील पाने खाणारी अळी
    
    
            ही कीड विविध पिकावर जगणारी असून केव्हातरी पण मोठया प्रमाणात येते. सध्या बीटी कपाशीवर या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सुरुवातीच्या काळात अळया समुहाने राहून पानाच्या मागील हिरवा भाग खरवडून खातात. नंतर एकएकटया राहून संपूर्ण पाने खातात. फक्त मुख्या शिरा व उपशीरा तेवढयाच शिल्लक ठेवतात. ही अळी फुले, कळया व बोंडावर सुध्दा प्रादुर्भाव करून खूप नुकसान करतात.
पाने पोखरणारी अळी
            ज्या शेतामध्ये वेलवर्गीय भाजीपाला घेतल्यानंतर कपाशीची लागवड केली जाते, अशा ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. या किडीची अळी पानाच्या आत शिरून हिरवा भाग खाते. त्यामुळे पानावर नागमोडी आकाराच्या रेषा दिसतात.
तांबडे ढेकूण
            ही कीड वर्षभर कार्यक्षम असते, पण सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये अधिक कार्यरत असते. प्रौढ ढेकूण व पिल्ले सुरुवातीला पानातील, कोवळया शेंडयातून रस शोषण करतात. पक्व बोंड आणि उमलेल्या बोंडावर बहुसंख्येने राहून सरकीतील रस शोषण करतात.
करडे ढेकूण
            ही कीड नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत कार्यक्षम असते. प्रौढ व  अर्धवट उमललेल्या बोंडातील, सरकीतील रस शोषून घेतात. त्यामुळे तेलाचे प्रमाण कमी होते व बियाण्याची प्रत घसरते. यंत्रामधून सरकी काढताना ही ढेकणे चिरडून रुईवर डाग पडतात.
लाल कोळी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या