Ticker

6/recent/ticker-posts

पीक फेरपालट करा, जमिनीची सुपीकता जपा...

पीक फेरपालट करा,
जमिनीची सुपीकता जपा...
जमीन व्यवस्थापनाचे उपाय
जमिनीचे सपाटीकरण
ज्या जमिनी उंच सखल किंवा चढ उताराच्या आहेत अशा जमिनींचे सपाटीकरण करावे. पाणी जमिनीवर साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाचे पाणी उताराच्या दिशेने चरीत सोडावे.
पाणी नियोजन 
क्षारपड जमिनीची सुधारणा झाल्यानंतर जमिनीत पाण्याची पातळी वाढू नये, यासाठी पाण्याचा कमी वापर करावा. त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. पाण्याची प्रत, क्षाराची प्रत, विद्राव्य क्षार २००० मिलिग्रॅम प्रति लिटर किंवा ३.१२ डेसी सायमन प्रती मीटरपर्यंत असल्यास ते पाणी ठिबक सिंचनासाठी वापरता येते.
जमिनीची मशागत
जमिनीत खोलवर नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. जमिनीच्या वरील भागातील क्षार खोलवर जाण्यास मदत होते. चोपण किंवा भारी जमिनीवर सबसॉयलर वापरून खोलवर नांगरणी करावी.
पिकाची फेरपालट
जमिनीची समस्या कमी करण्याचा दृष्टीने एकच पीक वारंवार घेऊ नये. पिकात थोडी फेरपालट करावी. उदा. कायम आडसाली ऊस लावण्यापेक्षा खरीप हंगामात सोयाबीन, भुईमूग यासारखी पिके घ्यावीत. तसेच ताग, शेवरी यासारखी हिरवळीच्या खतांची पिके घ्यावीत, त्यामुळे समस्या कमी होऊ शकते.
माती परीक्षण
मातीपरीक्षण केल्याने जमिनी कोणत्या प्रकारच्या आहेत हे जाणता येते. त्यामुळे जमिनीचे व्यवस्थापन व सुधारणा करणे सोपे जाते. त्यामुळे मातीपरीक्षण करून घ्यावे. खताची मात्रासुद्धा माती परीक्षण करून द्यावी.
रासायनिक खते
क्षारपड, चिबड जमिनीतून बऱ्याच प्रमाणात नत्राचा ऱ्हास होतो. त्याशिवाय स्फुरद, लोह व जस्ताची कमतरतासुद्धा आढळते. त्यासाठी नत्र खताची मात्रा २५ टक्के जास्त द्यावी. सेंद्रीय खतासोबत रासायनिक खते वापरावीत. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवता येते.
कंपोस्ट कल्चरचा वापर
कंपोस्ट कल्चरचा वापर करून शेतातील पाचट, गव्हाचे काड, भाताचे पिंजर, काडीकचरा इत्यादी टाकाऊ पदार्थपासून कंपोस्ट खत तयार करावे. या खताचा क्षारपड जमिनीत वापर केल्याने मातीची रचना बदलते. हवा अधिक पाणी यांच्या प्रमाणात सुधारणा होते. जादा पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.
जमीन क्षारयुक्त किंवा चोपण होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी
१. जमीन सपाट असाव्यात. बांधबंदिस्ती करावी.
२. जमिनीमध्ये पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
३. जमिनीतून पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावेत.
४. जमिनीत पाण्याची पातळी दोन मीटरचा खाली ठेवावी.
५. पिकांच्या वाढीसाठी लागेल तेवढेच पाणी द्यावे. विशेष करून ऊस पिकास खत व पाणी योग्य प्रमाणात द्यावे.
६. आपल्या भागातून कालवा वाहत असल्यास त्यामधून पाणी झिरपू देऊ नये.
७. हिरवळीची खते वापरून मातीची घडण चांगली ठेवावी. त्यामुळे हवा खेळती राहते, जादा पाण्याचा निचरा होण्यासाठी मदत होते.
८. विहिरीचे पाणी जास्त खारट असल्यास वापरू नये.
९. माती व पाणी तपासणीकरून जमिनीतील बदलांची माहिती घ्यावी.
१०. सूक्ष्म जलसिंचन व तुषार सिंचनाचा वापर करावा.
११. क्षार प्रतिकारक पिकाची निवड करावी.
Source::
: सचिन तेलंगे-पाटील : ९४२१०७०९७२,
(कृषी महाविद्यालय, बारामती)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या