तुरीवर दिसतोय मरुका अळीचा प्रादुर्भाव
मरुका (पाने-फुलांना जाळी करणारी अळी) या किडीचा प्रादुर्भाव तुरीच्या कमी कालावधीच्या जातींवर दिसून येतो. अळीचा प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यात आल्यापासून सुरू होतो. प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
तूर पीक फुलोऱ्याच्या काळात जास्त आर्द्रता व कमी तापमान या किडीच्या पुनरुत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. जास्त आर्द्रता असलेल्या भागात या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
- प्रौढ पतंग मध्यम विटकरी किंवा पिवळसर रंगाचे असतात.
- अंडी पिवळसर रंगाची, आकाराने उभट आणि फुलकळीवर एक-एक सुटी घातली जातात.
- सुरवातीस अळी ३ मि.मी. लांब असते. तिची पूर्ण वाढ झाल्यावर १४ ते २० मि.मी.लांब, हिरवट रंगाची होते. तिच्या शरीराच्या दोन्ही बाजूस काळे ठिपके असतात.
- कोषावस्था चमकदार किंवा चंदेरी रेशमी जाळ्यांनी विणलेली जमिनीवर वाळलेल्या पानावर असते.
- अळ्या पाने, फुलकळ्या आणि शेंगा एकत्र करून गुच्छ तयार करतात. आत मध्ये राहून उदरनिर्वाह करतात. अळी कोवळे शेंडे, कळ्या, पाने व कोवळ्या शेंगा खाते.
- शेंडे, पाने व शेंगा एकमेकांत चिकटल्यामुळे शेंगाचे प्रमाण कमी होते. मुख्य खोडाची वाढ खुंटल्यामुळे उत्पादन कमी होते.
एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन :
- मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची ओळ लावावी.
- शेत कोळपणी/निंदणी करून तणविरहित ठेवावे.
- प्रती हेक्टरी १ ते १.५ मीटर ‘T` उंचीचे ५० पक्षीथांबे बसवावेत. त्यावर बसून मित्र पक्षी अळ्या खातात.
रासायनिक नियंत्रण -
१. पहिली फवारणी फुलकळी येऊ लागताच -
- निंबोळी अर्काची फवारणी - पाच लिटर पाण्यात पाच किलो निंबोळी चुरा रात्रभर भिजवावा. दुसऱ्या दिवशी वस्त्रगाळ करून अर्क काढावा. हा पाच लिटर अर्क ९५ लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये एक किलो साबणचुरा मिसळावा. त्यामुळे निंबोळी अर्क पाण्यात चागंल्या प्रकारे मिसळतो. त्यानंतर हे मिश्रण गाळून फवारावे किंवा
-अझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना (५ अळ्या प्रती १० झाडे ) ः
(प्रति १० लिटर पाणी)
-प्रोफेनोफॉस (४० टक्के) २५ मि.लि. किंवा
- सायपरमेथ्रीन (२५ टक्के) ४ मि.लि.
३. तिसरी फवारणी - दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी -
(प्रति १० लिटर पाणी)
- क्लोरपायरीफॉस (२० ईसी) किंवा २५ मि.लि.
- स्पिनोसॅड (४५ ईसी) किंवा ४ मि.लि.
- इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ३ ग्रॅम
Source:
डॉ. सुभेदार जाधव, ९८२२९६९११५
(कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro