Ticker

6/recent/ticker-posts

द्राक्षबाग कीड-रोग

द्राक्षबाग कीड-रोग

राज्यात सर्वत्र पावसाळी आर्द्रतायुक्त वातावरण आहे. या वातावणामध्ये द्राक्षबागेमध्ये करपा, भुरी, केवडा, तांबेरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या वर्षी पाऊस उशिरा आल्याने आधीच वाढलेला मिलीबग, तसेच या अनुकूल वातावरणात जीवनचक्राची सुरवात करणारा खोडकिडा आढळून येतो. या कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी बागायतदार छाटणीनंतर रासायनिक घटकांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. मात्र, या आर्द्रतायुक्त वातावरणात जैविक घटकांचा वापर केल्यास संभाव्य कीड-रोगांची समस्या कमी होऊ शकते. तसेच रासायनिक कीडनाशकांचा उर्वरित अंश (रेसिड्यू)ही मर्यादेत राहू शकेल.

जून महिन्यामध्ये अनुकूल वातावरणामुळे द्राक्षबागेत मिलीबगचा प्रादुर्भाव दिसून आलेला होता. सध्या हा प्रादुर्भाव खोडावर, ओंलाड्यावर, ओलांड्यालगतच्या पानांच्या पाठीमागे दिसून येतो. सद्यःस्थितीत पुढील हंगामाच्या दृष्टीने या मिलीबगचे एकात्मिक व्यवस्थापन करणे योग्य ठरेल.या कालावधीत बागायतदार इमिडाक्‍लोप्रिडसारख्या आंतरप्रवाही फॉर्म्युलेशन्सचा वापर ड्रेंचिगसाठी करताना दिसून येतात. मात्र, या कालावधीत द्राक्षबागेत बोदामध्ये वाफसा, पांढऱ्या मुळींची उपलब्धता, बागेतील तणांची वाढ, ठिबक संचाची कार्यक्षमता यांसारख्या घटकांचा परिणाम आंतरप्रवाही कीडनाशकांच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो. या कालावधीमध्ये जमिनीलगत गवतावरदेखील मिलीबगच्या अवस्था आढळून येतात.दर वर्षी एप्रिल-मे महिन्यात कोषावस्था संपून आर्द्रतायुक्त वातावरणात खोडकिडीचे प्रौढ बाहेर पडतात. या हंगामात लांबलेल्या पावसाने खोडकिडीच्या जीवनचक्रावर परिणाम होऊ शकतो. खोडकिडीची प्रौढ अवस्था खोडाबाहेर पडण्यास उशीर झाल्यास अंडी घालण्याचा कालावधीदेखील लांबू शकतो. त्यामुळे येत्या हंगामात खोडकिडीची अळी अवस्था उशिरापर्यंत बागेत आढळू शकते. सध्या प्रौढावस्थेबरोबरच अंडी अवस्थादेखील बागेत असेल. अशा परिस्थितीत बागेतील या किडीच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना राबविणे आवश्‍यक आहे.

मिलीबग व खोडकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी व्हर्टिसिलीयम लेकॅनी, मेटारायझिम ऍनिसोप्ली, बिव्हेरिया बॅसियाना यांसारख्या जैविक बुरशीजन्य कीडनाशकांचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. आर्द्रतायुक्त वातावरणात या बुरशीजन्य कीडनाशकांची वाढ किडींच्या शरीरावर चांगल्या प्रकारे होते. ही बुरशीजन्य कीडनाशके वापरण्यापूर्वी गुळाच्या पाण्याची प्रक्रिया केल्यास अधिक फायदा मिळतो. बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझियम या बुरशीच्या वापरामुळे खोडकिडीच्या प्रौढावस्थेचा चांगला बंदोबस्त होऊ शकतो.

व्हर्टिसिलीयम लेकॅनी व बिव्हेरिया बॅसियाना या बुरशींच्या वापरामुळे मिलीबगच्या अवस्थांचा नाश होऊ शकतो. निमोरिया रायली, बिव्हेरिया बॅसियाना या बुरशीमुळे बागेतील तणांवरील अळ्यांचा बंदोबस्तदेखील चांगल्या प्रकारे होतो.

साधारणपणे मे महिन्याच्या शेवटपासून किंवा जून महिन्याच्या सुरवातीपासून बागेत भुरीची समस्या जाणवू लागते. नंतरच्या काळात परिपक्व होत जाणाऱ्या काडीवर फुटणाऱ्या अतिरिक्त कोवळ्या फुटींवर डाउनी रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागतो. छाटणी जवळ आल्यानंतर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. उशिरा होणाऱ्या छाटणीसाठी पाने टिकवणे फार महत्त्वाचे असते. या हंगामात काडी परिपक्वतेची समस्या फारशी जाणवत नाही. त्यामुळे बागायतदार बंधूंनी छाटणीचे नियोजन करताना बागेत वाढणाऱ्या भुरी, डाउनीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबटिलीस, सुडोमोनास फ्लुरोसन्स, ऍम्पोलोमायसिस क्विसकॅलिस यांसारख्या जैविक घटकांचा वापर करावा. त्यामुळे रोगांचे चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकते.

ट्रायकोडर्मासारख्या जैविक बुरशीनाशकाचा जमिनीतून वापर करावा. त्यामुळे बोदावर टाकलेल्या काड्या, शेणखत, पाचटाचे मल्चिंग, काडीकचरा इत्यादी पदार्थ कुजताना त्यातील रोगग्रस्त अवशेष नष्ट होतात. काडीकचरा कुजल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. बागेतील बोद भुसभुशीत होऊन पांढरी मुळी कार्यक्षम राहते.

मागील हंगामात रासायनिक कीडनाशकांच्या अंश पातळी (रेसिड्यू)चा अनुभव आलेल्या बागायतदारांनी जैविक कीडनाशकांचा वापर अभ्यासपूर्वक करावा.

या जैविक घटकांचा वापर करण्यापूर्वी व केल्यानंतर साधारणपणे 7 दिवसांपर्यंत कोणत्याही रासायनिक बुरशीनाशकांची फवारणी बागेत घेऊ नये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या