Ticker

6/recent/ticker-posts

लिंबू लागवड तंत्र

लिंबू लागवड तंत्र 🍋🍋

Source:

 श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर

 पी.एचडी स्कॉलर (फळशास्त्र),जूनागढ कृषि विद्यापीठ, गुजरात

-----------------------

लिंबू हे फळ उष्ण कटिबंधातील बहुतेक प्रदेशांत वाढते. याचे मूळस्थान भारत असावे असे मानतात. मेक्सिको, वेस्ट इंडीज, इजिप्त व भारत हे कागदी लिंबाच्या उत्पादनात अग्रेसर देश आहेत. महाराष्ट्र राज्यात ज्या अनेक फळझाडांची लागवड केली जाते त्यामध्ये लिंबूवर्गीय फळझाडांच्या फार मोठा वाटा आहे. भारतात या फळाची लागवड सुमारे २,८५,००० हेक्टर क्षेत्रात होते. लिंबूवर्गीय फळझाडांच्या लागवडीस भारतात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये मोसंबी, संत्रा व कागदी लिंबू यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील हवामान लिंबूवर्गीय फळझाडाच्या लागवडीस पोषक असल्यामुळे कागदी लिंबू लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढत असून सध्या ४५,००० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र कागदी लिंबूच्या लागवडीखाली आहे. प्रामुख्याने अहमदनगर, जळगाव व सोलापूर या कोरड्या हवामानाच्या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर आणि त्या खालोखाल पुणे, सांगली, धुळे, अकोला व नाशिक या जिल्ह्यांत कागदी लिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात आढळते. त्या खालोखाल पुणे, यवतमाळ, नाशिक, सांगली, नागपूर, धुळे व बीड यांचा क्रम लागतो. कोकणात कागदी लिंबूची लागवड आढळून येत नाही. कारण दमट हवामानात कँकर तसेच मूळकुज रोगाचा जास्त प्रादुर्भाव आढळतो. महाराष्ट्रसोबतच  आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक व गुजरातमध्ये लिंबूवर्गीय फळपिकांची लागवड केळी जाते. 

या फळाचे कागदी लिंबू व साखर लिंबू असे दोन प्रकार भारतात लागवडीत आहेत. यांपैकी कागदी लिंबाला जास्त मागणी असल्यामुळे त्याची व्यावसायिक लागवड होते. 


हवामान व जमीन :

या फळाला उबदार, थोड्या प्रमाणात दमट व जोराच्या वाऱ्यापासून मुक्त असलेले हवामान फार पोषक असते.  कोरडे हवामान, कमी पर्जन्यमान व १० अंश सेल्शिअस पासून ४० अंश सेल्शिअस तापमानाच्या प्रदेशात या झाडाची वाढ जोमदारपणे होते. महाराष्ट्राचे हवामान या फळाच्या लागवडीस पोषक आहे. फार पावसाच्या व कडाक्याची थंडी पडणाऱ्या प्रदेशात या फळाची लागवड व्यापारी दृष्ट्या फायदेशीर ठरत नाही. जास्त पाऊस व दमट हवामानात कागदी लिंबावर खैऱ्या रोग (कॅंकर) जास्त प्रमाणात दिसून येतो. 

कागदी लिंबू पिकाला सुमारे २ ते २.५ मीटर खोलीची मध्यम काळी, हलकी मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, जास्त चुनखडी (५ ते ७ टक्के) व क्षार नसणारी जमीन निवडावी. साधारणपणे ६.५ ते ८ सामू क्षारांचे प्रमाण ०.१ टक्‍क्‍यापेक्षा कमी असलेली जमीन कागदी लिंबू लागवडीस चांगली असते. फार खोल व भारी जमिनी तसेच उथळ, पाणथळ, चोपण, रेताड व खडकाळ जमिनी या फळाच्या लागवडीसाठी योग्य नाहीत.सुधारीत जाती :

लागवडीसाठी साई सरबती, विक्रम, फूले शरबती किंवा प्रेमालिनी जातीची रोपे निवडावीत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शोधलेली साई सरबती ही लिंबाची जात स्थानिक जातींपेक्षा जास्त उत्पादन देते.

साई शरबती – 

  • एकरी १८ ते १९ टन प्रती वर्ष उत्पन्न. 
  • ४५ ते ५० ग्राम फळाचे वजन. 
  • फळे अंडाकृती, ए
  • कसारखी आकाराची आणि फळे पातळ सालीची. 
  • कॅंकर आणि ट्रिस्टेझासाठी सहनशील.

फुले शरबती -  

  • लवकर बहर - तिसऱ्या वर्षापासून बहार घेता येतो. 
  • एकरी १८ ते २० टन प्रती वर्ष उत्पन्न. 
  • जोमदार झाडांची वाढ व रोग व किडीस जादा सहनशील. 
  • राज्यात काही भागांत चक्रधर, बालाजी, पीकेएम-१, मल्हार या जातींचीही लागवड आढळते.अभिवृद्धी :  

कागदी लिंबांची अभिवृद्धी बियांपासून व कलमांद्वारे होत असली तरी कागदी लिंबांची लागवड बियांपासून तयार केलेल्या रोपांपासूनच करावी. बियांपासून तयार केलेल्या रोपात मातृवृक्षाचे १०० टक्के गुणधर्म उतरलेले असतात. अशी रोपे प्रथमतः विषाणूमुक्त असतात. रोपांपासून मिळणारी फळे पातळ सालीची व रसाचे प्रमाण जास्त असणारी असतात. बियांपासून रोपे तयार केल्यास बीजांकूर शास्त्रोक्‍त पद्धतीने होत असते व ही झाडे दीर्घायुषी व जास्त उत्पादनक्षम असतात.

कागदी लिंबांचे बी उगवून आल्यावर ३ किंवा ४ रोपे येतात. त्यांपैकी एक लैंगिक जननाचे व बाकीची अलैंगिक जननाची असतात. अलैंगिक जननाच्या रोपांना ‘न्युसेलर रोपे’ म्हणून प्रचलित आहेत. लैंगिक जननापासून तयार झालेली रोपे खुरटी असतात व त्यांपासून वाढलेल्या झाडांची फळे एकसारखी असत नाहीत. यासाठी बिया उगवून आल्यावर रोपवाटिकेत अशी रोपे उपटून टाकतात. 

लिंबू लागवडीसाठी रोपे रंगपूर लिंब किंवा झंबेरी खुंटावर डोळा भरूनही करतात. रोपे खात्रीच्या ठिकाणाहूनच घ्यावीत. यासाठी आपल्या भागातील सरकारमान्य रोपवाटिका, कृषि विज्ञान केंद्र, कृषि महाविद्यालय, कृषि विद्यापीठ किंवा कृषि खात्यातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.लागवड:

लागवड पावसाळा सुरु झाला कि जून-जुलैमध्ये करावी, तथापि लागवड वर्षभरही करता येते. परंतु, हिवाळ्यातील लागवडीस वाढ कमी होते, तर उन्हाळ्यातील लागवडीस पाणी अधिक लागते. रोपे लागवडीपूर्वी १ महीना अगोदर ६ बाय ६ मीटर अंतरावर १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे घेऊन ते उन्हात तापू देणे गरजेचे आहे. लागवडीपूर्वी काडीकचरा, शेतातील पालापाचोळा, पोयटा माती, १० किलो चांगले कुजलेले शेणखत, १-२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २५ ग्रम ट्रायकोडर्मा आणि १ कीलो निंबोळी पेंड यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत.  रोपे पिशवी फाडून मधोमध लावून, मुळांना इजा न होऊ देता चारही बाजूने माती घट्ट दाबावी आणि लगेच पाणी द्यावे.

खत व्यवस्थापन :

हवामानाचा विचार करता लिंबाच्या झाडास वर्षातून तीन वेळा म्हणजेच जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्‍टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारीत नवीन पालवी येते. प्रत्येक वेळी नवीन वाढीपूर्वी सुरवातीच्या काळात नियमित खतांचा पुरवठा करणे जरुरीचे आहे. खतमात्रा माती परीक्षणानुसारच द्यावी. पहिल्या वर्षी लागवडीनंतर सप्टेंबरमध्ये प्रती झाड ५० ग्रम नञ व जानेवारीमध्ये ५० ग्राम नत्र द्यावे. दुसऱ्या वर्षी जूनमध्ये प्रती झाड १५ कीलो चांगले कुजलेले शेणखत, १०० ग्रम नञ, २ कीलो निंबोळी पेंड, सप्टेंबरमध्ये ५० ग्रम नञ जानेवारीमध्ये ५० ग्रम नञ द्यावे. तिसऱ्या वर्षी जूनमध्ये प्रती झाड १५ कीलो चांगले कुजलेले शेणखत, १ किलो सुफला, २ कीलो निंबोळी पेंड, सप्टेंबरमध्ये १०० ग्रम नञ जानेवारीमध्ये १०० ग्रम नञ द्यावे. तर ४ वर्षापासून जूनमध्ये प्रती झाड १५ कीलो चांगले कुजलेले शेणखत, १ किलो सुफला, ५०० ग्रम म्युरेट ॲफ पोटँश, १-५ कीलो निंबोळी पेंड, सप्टेंबरमध्ये १५० ग्रम नञ जानेवारीमध्ये १५० ग्रम नञ द्यावे. पाचव्या वर्षापासून पुढे या खतांशिवाय ५०० ग्रम व्हँम, १०० ग्रम स्फूरद विरघळणारे जिवाणु १०० ग्रम ॲझोस्पिरीलम आणि १०० ग्रम ट्रायकोडर्मा हरजियानम यांचे एकञ मिश्रण द्यावे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढलळ्यास झिंक सल्फेट, मँग्नेशियम सल्फेट  यांची प्रत्येकी ०.५% आणि ०.३० % फेरस सल्फेट व कॉपर सल्फेट या सुक्ष अन्नद्रव्याची एकञित फवारणी करावी. फळकाढणी नंतर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसण्याचे प्रमाण अधिक असते.

रासायनिक खताला पर्याय म्हणून गांडूळ कंपोस्ट हिरवळीच्या खतांचा वापर करावा. चुनखडी, खारवट जमिनीत ताग किंवा धैंच्याचे पीक घेऊन ते फुलोर्‍यात येतानाचा गाडावे. गाडल्यानंतर २ ते ३ वेळा ४-५ दिवसाला पाणी द्यावे, म्हणजे महिन्याभरात ते लवकर कुजून जाते.


पाणी व्यवस्थापन:

हे बागायती बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे हमखास पाणीपुरवठ्याची सोय असेल तेथेच लागवड करावी. लिंबाच्या झाडाला पाणी देताना ते झाडाच्या खोडाला लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. याकरिता ४ वर्षानंतर झाडांना दुहेरी आळे (डबल रिंग) पद्धतीने पाणी द्यावे. कागदी लिंबाची मुख्ये मुळे साधारणतः ६० सेंमी. खोलीपर्यंत असतात. पाण्याचे प्रमाण व दोन पाळ्यांमधील अंतर हे जमिनीचा प्रकार, हवामान, झाडाचे वय व वाढीची व्यवस्था यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात ६ ते ८ दिवसांच्या अंतराने व हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाणी बचतीसोबतच अधिक उत्पन्न निघण्यास मदत होते.

 


आंतरपिक :

कागदी लिंबाच्या झाडांची लागवड सुरवातीच्या चार-पाच वर्षांपर्यंत फळे येण्यापूर्वी लिंबांच्या दोन झाडांमधील मोकळ्या जागेत सुरवातीला मूग, चवळी, हरभरा, घेवडा, भुईमूग, उडीद, कांदा, लसूण, कोबी, मेथी, कोथिंबीर, शेपू, गहू, मोहर, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, वेलवर्गीयमध्ये काकडी, टरबुज, खरबूज, डांगर भोपळा यांसारखी आंतरपिके घ्यावीत. तूर तसेच आले, हळद, मका, बटाटा, रताळी हि अन्नद्रव्ये जास्त घेणारी पिके करू नयेत. करू नये. आंतरपिके घेताना मुख्य पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होणार नाही आणि बागेची सुपीकता कायम राहील याची काळजी घ्यावी. शक्यतो कीड व रोगाला बळी पडणारी आंतरपिके करू नयेत. मुख्य पिकाव्यतिरिक्त आंतरपिकास शिफारशीप्रमाणे खताची वेगळी मात्रा द्यावी.


छाटणी :  

झाडाला पुरेसा सुर्यप्रकाश व खेळती हवा मिळण्यासाठी आणि झाड मजबूत बनविण्यासाठी लहान वयातच झाडाची छाटणी करून त्यास वळण देणे आवश्यक असते. जमिनीलगतची खोडावरील फूट काढून टाकतात व मुख्य खोड जमिनीपासून ७५ ते ९० सेंमी. उंचीपर्यंत त्यावर आलेली फूट वारंवार काढून सरळ वाढू देतात. ७५ सेंमी. उंचीवर चोहोबाजूला विखुरलेल्या स्थितीत ३ ते ४ जोमदार फांद्या ठेवतात. छाटणी करताना झाडाच्या घेराच्या खालील भागात आर्द्रता आणि उष्णता निर्माण झाल्याने खालील भागातील फांद्यांना बहार जास्त लागत असतो; त्याकरीता खालील फांद्या जादा न छाटता बाहेरून थोड्याथोड्याच छाटाव्यात. दाट वाढलेल्या फांद्यातून काही फांद्या छाटून झाडाला झाडाला छात्रीसारखा आकार द्यावा.बहार व्यवस्थापन :

झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे म्हणजे बहर धरणे. कागदी लिंबाच्या झाडास बारमाही ओलित लागत असल्याने वर्षातून तीन वेळा म्हणजेच जून-जुलै (मृग बहार), सप्टेंबर-ऑक्‍टोबर (हस्त बहार) आणि जानेवारी-फेब्रुवारीत (आंबे बहार) अनियंत्रितपणे फुलोरा येतो. कागदी लिंबांत विशिष्ट बहर धरणे शक्‍य असले तरी आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही, म्हणून तिन्ही बहरांपासून फळाचे उत्पादन घ्यावे. तथापि, मार्च-एप्रिल व मे महिन्यात लिंबांना मागणी जास्त असते, म्हणून हस्त बहराचे नियोजन करावे. त्यासाठी उन्हाळ्यात पाण्याची उत्तम सोय असावी लागते. सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये फुलोऱ्याचे प्रमाण फक्त १० ते १५ टक्के असते. कागदी लिंबू हस्त बहारातील  जास्त उत्पादनासाठी जून महीन्यात १० पीपीएम जिब्रेलिक ॲसीड, सप्टेंबरमध्ये १००० पीपीएम सायकोसील संजिवकाची व आँक्टोबर महीन्यात १ टक्के पोटँशियम नायट्रेट द्रावणाची फवारणी करावी. सायकोसिलसारख्या वाढविरोधक संजीवकामुळे अतिरिक्त शाखीय वाढ, शेंडावाढ मंदावते व रोगप्रतिकारकशक्ती सुधारते.


फळांची गळ थांबविण्यासाठी व उत्पादनात ५० टक्के वाढ होण्यासाठी २,४-डी या वृद्धीनियंत्रकाची फवारणी करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. १० पीपीएम २, ४-डी या प्रमाणात पहिली फवारणी झाडे फुलावर असताना दुसरी फळधारणेनंतर एक महिन्याने आणि तिसरी फळे काढण्याअगोदर एक महिना करतात. एनएए या वृद्धीनियंत्रकाचाही वापर या कामासाठी करतात.


वेळोवेळी तण नियंत्रण करून बाग स्वच्छ ठेवावी. झाडे लहान असताना त्यांचे कडक उन्हापासून व कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करणे आवश्यक असते. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी झाडांना चुना लावतात व थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गव्हाचे काड, भुस्सा, इत्यादी वापरून झाडाच्या खोडाभोवती आच्छादन करावे.  पिकसंरक्षण :

लिंबावर वेगवेगळ्या किडी-रोगांचा उपद्रव होत असतो, यामुळे फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होतोच, त्याचबरोबरीने उत्पादनातदेखील घट येते. यासाठी किडी-रोगांच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून योग्य वेळी नियंत्रणाचे उपाय करावेत. बागेत स्वच्छता राखावी, पडलेली पाने, फळे गोळा करून नष्ट करावीत. 


कीड :

लिंबावरील फुलपाखरू – ही अळी हिरव्या रंगाची असते व तिच्या डोक्यावर दोन शिंगे असतात. फुलपाखरू पिवळ्या रंगाचे असते व पंखावर काळ्या खुणा असतात.  अळी कोवळी पाने कुरतडून खाते व फक्त पानांच्या शिरा शिल्लक राहतात. अळीचा उपद्रव नर्सरीमध्येही जास्त आढळतो. 

नाग अळी – ही अळी पिवळसर रंगाची असते व पतंग सोनेरी रंगाचा असतो.  लहान अळी पाने पोखरून आतील पर्णपेशी खाते, त्यामुळे आतील बाजूस वेडीवाकडी पोकळी किंवा खाण तयार होते. अशी पाने पिवळी होऊन गळून पडतात. ही अळी कॅंकर रोग पसरवण्यासही मदत करते. 

काळी माशी व पांढरी माशी - नावाप्रमाणेच पांढरी माशी पांढरट, पिवळसर रंगाची असते व काळी माशी काळ्या रंगाची व लहान आकाराची असते.  पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषण करतात, त्यामुळे पाने सुकतात व तपकिरी रंगाची होतात. रस शोषण केल्यामुळे पानांवर मधासारखा चिकट द्रव स्रवतो व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यास "कोळशी' रोग असेही म्हणतात. 

रस शोषण करणारा पतंग – हा पतंग मोठ्या आकाराचा असतो. पुढचे पंख राखाडी किंवा तपकिरी रंगाचे असतात. पाठीमागचे पंख पिवळ्या रंगाचे असतात व त्यावर गोलाकार किंवा किडनीच्या आकाराचा काळा ठिपका असतो. अळी पिकास हानिकारक नसते. ती बांधावरील गवत खाते. पतंग मात्र फळामध्ये तोंड घुसवून फळातील रस शोषण करतो व नंतर झालेल्या छिद्रांतून बुरशी, जिवाणू यांचा फळामध्ये प्रवेश होतो व त्यामुळे ते फळ पूर्णपणे नासून जाते. 

सिट्रस सायला - लहान आकार, तपकिरी रंग, टोकदार डोके व यांच्या शरीराची मागची बाजू वर उचललेली असते. पिल्ले व प्रौढ पाने, फुले व कोवळ्या फांद्यांमधून रस शोषण करतात, त्यामुळे पाने गळून पडतात व कोवळ्या फांद्या वाळून जातात. जी लहान फळे आलेली असतील, तीसुद्धा गळून पडतात.


रोग :

खैरा (कँकर)- हा कागदी लिंबाच्या झाडावरील सर्वांत महत्वाचा रोग ‘झान्थोमोनास’ या अणूजीवतंतूमुळे होतो. हा रोग फार संसर्गजन्य असून पावसाळी हवामान व अधिक आर्द्रता असल्यास झपाट्याने पसरतो. सुरुवातीला पानांना टाचणीच्या टोकाएवढे लहान, गोल, गर्द हिरवे व पाणीयुक्त ठिपके पृष्ठभागावर दिसतात. हे ठिपके तांबूस रंगाचे खरबरीत होऊन पानांच्या दोन्ही बाजूस दिसतात. ठिपक्यांभोवती पिवळ्या रंगाचे वलय तयार होऊन कालांतराने ते नाहीसे होते. पुढे हे ठिपके फांद्यावर वाढतात आणि झाड देवीचे व्रण ग्रासल्यासारखे दिसते. परिणामी शेंड्याकडील फांद्या मरतात. तसेच झाडे खुरटल्यासारखी दिसतात. फळांवर टिपक्यांची वाढ झाल्यास फळे तडकतात व अशा फळांना बाजारात मागणी नसते. रोपवाटिकेतील रोपांना या रोगाचा संसर्ग झाल्यास रोपांमध्ये पाने पोखरणार्‍या अळीने पोखरलेल्या मार्गाद्वारे हा रोग वेगाने पसरतो.

टिस्टेझा - या रोगाची लागवड झाल्यावर झाडाची नवीन फूट पुर्णपणे किंवा अपुर्ण अवस्थेत दाबून राहते. झाडावरील पाने निस्तेज आणि शिरा पिवळसर किंवा पांढरट होतात. पाने लांब दिशेने परंतु आतील बाजूने कुरळे होतात. नवीन पालवीचे पोषण नीट न झाल्यामुळे पानगळ होते. हा रोग ओळखण्यासाठी पाने सुर्यप्रकाशात बधितल्याने त्यामधील शिरा पोकळ झाल्यासारख्या दिसतात. झाडाच्या खोडाच्या किंवा मोठ्या फांदीच्या सालीखालील भागावर सुईने टोकरल्यासारखी खोल व्रण (स्टेम पिटर्स) दिसतात.

मुळकुज व डिंक्या : हा रोग फायटोप्थोरा या बुरशीमुळे होतो. सुरुवातीस मुळकुजीची लागण होऊन तंतुमय मुळे कुजतात. कालांतराने ही कूज मोठ्या मुळांपर्यंत जाऊन खोडावर पायकूज होते. खोडाच्या सालीवर ओलसर ठिपके दिसतात व त्या ठिकाणी उभ्या चिर पडून त्यामधून पातळ डिंक बाहेर पडतो. असा भाग तांबट तपकिरी दिसतो व या भागावरील पेशी मरून ठसूळ होतात. अशा झाडातील पाने निस्तेज होऊन शेंड्याकडील पाने पिवळी पडतात व पानगळ होते. झाडामध्ये अन्नद्रव्याचे अभिसरण मंदावल्यामुळे अकाली बहर येऊन फळे अपक्क स्थितीत गळून पडतात.

शेंडेमर : जुन्या व दुर्लक्षीत बागेत बुरशीच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या फांद्या वरून खाली वाळत येतात. या रोगाचा प्रसार दुय्यम माध्यमातून होतो. जसे तंतुमय मुळाजवळ अतितीव्र क्षारांचे अधिक प्रमाण. अन्नद्रव्यांची कमतरता, इतर किडी व बुरशीमुळे फांद्यांना व मुळांना झालेली इजा, जमिनीत जास्त काळ पाणी साचणे इ. कारणाने कोलेटोटायकम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे नवीन व पक्क फांद्या वरूनखाली वाळण्यास सुरुवात होते. नंतर ही मर बुंध्यापर्यंत जाते आणि त्यामुळे डायबॅकची लक्षणे दिसतात.


विकृती :

पाने पिवळी पडणे लाईम इंड्यूस्ड आयर्न क्लोरॅसिस : लिंबाच्या झाडाच्या दक्षिणेकडील भाग हा कायम रोगट दिसतो. पाने पिवळी पडतात. पानांवर गुंडाळी येते. फुले व फळे कमी लागतात.

पानगळ : यामध्ये पाने बशी व कपासारखी, विळ्याच्या आकारासारखी कातरलेली दिसतात.पानांवर डाग,फोड दिसतात.ताम्रचे प्रमाण कमी झाले तर पानगळ झपाट्याने होते. (सेंद्रिय पदार्थ अधिक झाल्यास कर्ब नत्र गुणोत्तर प्रमाण वाढतो व झपाट्याने पानगळ होते.)काढणी व उत्पादन :

साधारण लागवडीनंतर चौथ्या वर्षी ४०० ते ५०० फळे मिळतात. ५ ते ७ वर्षाच्या एका झाडापासून २ ते ३ हजार फळे मिळतात. साई शरबती आणि फुले शरबती या वाणांपासून त्याहीपेक्षा अधिक फळे मिळतात. फळांचे उत्पादन वर्षाच्या काही महिन्यांत सर्वांत जास्त असते. हा काळ भारतात वेगवेगळ्या भागांत वेगवेगळा असतो. गुजरात व महाराष्ट्र भागांत ६० ते ७० टक्के फळे जुलै ते सप्टेंबर या काळात व बाकीची फेब्रुवारी ते मे पर्यंत मिळतात. लिंबू लागवडीचे अर्थशास्त्र हे प्रत्येक बहरापासून मिळणारे उत्पादन आणि बाजारभाव यावर अवलंबून असते. 


उपयोग : 

लिंबामध्ये लोह व 'क' जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर असते.काविळ झाल्यास लिंबू कापून त्यावर खायचा सोडा टाकून पहाते चोखावा. लिंबू व मध याचा एकत्रित रस घेतल्यास मेद व कोलेस्ट्रोल कमी होतो. मुरडा कमी होण्यासाठी लिंबाचा रस गरम करून त्यात सैंधव, खडीसाखर टाकून घ्यावा. लिंबाच्या रसामध्ये हळद टाकून वाफेवर ठेवून घेतले तर बद्धकोष्टता, कडकी कमी होते. पित्त, दाह थांबण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एका लिंबाचा रस पिळून त्यात थोडी साखर टाकून घ्यावा. लिंबाचा रस डोक्याला चोळला असता डोक्यातील कोंडा कमी होतो. दातातून रक्त आल्यास लिंबाचा रस हिरड्यांवर घासावा. लिंबाचा रस रुचकर, पचनशक्ती वाढविणारा तसेच त्याचारोग यासाठी त्याचा वापर केला जातो. लिंबाचा रस, आले व मिरीची पूड टाकून घेतल्यास पोटाच्या तक्रारी थांबतात. लहान मुलांना दूध पचत नसल्यास अर्धा ते एक चमचा लिंबाचा रस पाजावा. साखर व लिंबाचा रस डोक्यावर घासल्यास उवा जातात. लिंबाचा रस पाण्यात घालून अंग धुतल्यास काय सुधारते. लिंबाचे काप करून त्यावर सुंठ, सौंधव टाकून गरम करून चोखाल्यास अजीर्णाची ओकारी थांबते.


प्रक्रिया पदार्थ : लिंबापासून सायट्रीक अॅसिड मिळते. लिंबाचे तेलामध्ये सिट्राल, लिमोनिन, लिनालॉन, लिनाईल अॅसिटेट, टर्पेनॉल, सायमील इ. पदार्थ मिळून ते पदार्थास सुगंध व स्वाद आणण्यासाठी वापरतात. सालीपासून, पानांपासून, छाटलेल्या फांद्यापासून लेमन ऑईल निघते ते फार महाग असून ह्यापासून तयार केलेल्या कॅल्शिअम सायाट्रेट, लाईम ऑईलला परदेशात मोठी मागणी आहे. लिंबाच्या बियांपासून जे तेल निघते ते साबण उद्योगामध्ये कापडांना रंग देण्यात वापरतात. लिंबापासून पेक्टिक अॅसीड, सायट्रेट औषधी आहे. लिंबू तसेच खाल्ल्यास त्यातील तेलाने स्मरणशक्ती वाढते असे एका ठिकाणी वाचण्यात आले आहे. त्याचे प्रयोग करून निरीक्षणे आमचेकडे पाठवावीत.


भारतातील अनेक भागात मांसाहार केल्या जातो व लिंबू हे पचनासाठी उपयुक्त असल्याने या प्रदेशांमध्ये लिंबाला वर्षभर मागणी असते. अश्या प्रदेशात लिंबू निर्यात करून अधिक उत्पन्न मिळवता येते. याचप्रमाणे भारतातील दर चार माणसामागे एक माणूसाच्या आहारात लिंबाचा समावेश असतो. या बाबींचा विचार करून लिंबू फळबागेचे योग्य नियोजन केल्यास अधिका-अधिक उपन्न घेता येऊ शकते. गुणधर्माने आंबट असणारे हे फळ शेतकऱ्यांच्या जीवनात गोडी आणायचे समर्थ बाळगून आहे.


 Source :

श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर

 पी.एचडी. (फळशास्ञ) स्कॉलर, जुनागढ कृषी विद्यापीठ, गुजरात.  संपर्क- ९४२२२२११२०

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro