Ticker

6/recent/ticker-posts

कपाशीवरील बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

कपाशीवरील बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन


कपाशीवरील बोंडअळीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत होते. मात्र, २००२-०३ मध्ये बोंडअळीस प्रतिकारक असणाऱ्या बीटी कापसाला व्यापारी तत्त्वावर संमती भारतात मिळाली. त्यात एकेरी ‘क्राय १ एसी’ हे जनुक कपाशीत टाकण्यात आले. त्यानंतर बीटी कापसाच्या एकेरी जनुक असलेल्या (क्राय १ एसी, क्राय १ सी, क्राय १ एफ, विप ३ ए) आणि दुहेरी जनुक (क्राय १ एसी + क्राय २ एबी) असलेल्या संकरित वाणांची लागवड सुमारे ९५ टक्क्यापर्यंत पोचली. त्यामुळे कपाशीला अमेरिकन बोंडअळी, ठिपक्यांची बोंडअळी आणि गुलाबी बोंडअळी या तीन प्रकारच्या बोंडअळ्यांपासून संरक्षण मिळू लागले. मात्र, नवीन अहवालानुसार गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये बीटी कपाशीचा प्रभावीपणा तंत्रज्ञानाच्या बिघाडामुळे कमी झाला आहे. या कपाशीवरही बोंडअळीचा (मुख्यतः गुलाबी बोंडअळी) प्रादुर्भाव दिसून येत आहे. गतवर्षी महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यांत बीटी कपाशी पिकात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला. काही अहवालानुसार मागील दोन वर्षांत अमेरिकन बोंडअळी ‘बोलगार्ड २’ मध्ये गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आढळून आली आहे. 
१. अमेरिकन बोंडअळी - अमेरिकन बोंडअळीच्या लहान अळ्या सुरवातीला कापसाची पाने खातात व नंतर पात्या व कळ्यांना नुकसान पोचवितात. मोठ्या अळ्या बोंडांना छिद्र पाडून आतील भाग खाऊन पोकळ करतात व अळीचा अर्धा भाग बोंडाच्या बाहेर असतो. छिद्राभोवती अळीची विष्ठा साचलेली असते. प्रादुर्भावग्रस्त पात्या व लहान बोडे नंतर गळून पडतात. या अळीने केलेले छिद्र अनियमित गोल व तुलनात्मकदृष्ट्या मोठी असतात.
- अळी पात्या व फुलांवर प्रामुख्याने आढळून येते. तसेच ती आपल्या जीवनकाळात ३०-४० बोंडांचे नुकसान करू शकते. अळी प्रादुर्भावग्रस्त बोंडे सडून गेल्याने कापूस उत्पादनात सुमारे ४० टक्के घट होते.
- ऋतूनिहाय अळ्या येण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. या किडीचा प्रादुर्भाव ऑगस्टपासून नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत वाढू शकतो.
- अमेरिकन बोंडअळी प्रामुख्याने विदर्भामध्ये अतिघन पद्धतीने लागवड केलेल्या गैरबीटी हिरसुटम या वाणावर आढळते. काही अहवालानुसार ‘बोलगार्ड २’ मध्येही अमेरिकन बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. 
२. ठिपक्यांची बोंडअळी - ठिपक्यांची बोंडअळी कपाशीला पात्या येण्याच्या अगोदर प्रथम कोवळ्या शेंड्यांना छिद्र पाडून पोखरून खाते. असे शेंडे सुकून नंतर वाळून जातात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे पात्या अर्धवट उमलतात व गळून पडतात. एक अळी अनेक बोंडांवर छिद्र पाडत असल्याने अळ्यांच्या संख्येच्या तुलनेत नुकसानग्रस्त बोंडाचे प्रमाण वेगळे असते. नुकसानग्रस्त बोंडावर संसर्गजन्य जिवाणू व बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. कोरडवाहू कपाशीमध्ये या अळीमुळे होणारे नुकसान १० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते. 
३. गुलाबी बोंडअळी - गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरवातीला फुलावर असतो. त्यामुळे फुले पूर्ण उमलत नाहीत. ती अर्धवट उमललेल्या अवस्थेत गळून पडतात. अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरते. हे छिद्र बंद होते. कोवळ्या बोंडातील सर्वच भाग ती खाऊन टाकते, तर जुन्या बोंडातील ३-४ बिया ही अळी खाते. एका बोंडामध्ये एकापेक्षा जास्त अळ्या असू शकतात. गुलाबी बोंडअळीने प्रादुर्भाव झालेली फुले म्हणजेच ‘डोमकळी’सारखी दिसतात. परिपूर्ण बोंडामध्ये लहानसे छिद्र दिसून येते. गुलाबी बोंडअळी बोंडात राहून सरकीचेही नुकसान करते.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पेरणीनंतर ९० दिवसांनी येतो. मात्र, ऑगस्ट महिन्यात (पेरणीनंतर ६० दिवसांनी) गैरबीटीमध्ये काही प्रमाणात दिसून येतो. 
अन्य किडी -
तंबाखूची पाने खाणारी अळी - या किडीचा प्रामुख्याने ऑगस्ट महिन्यात प्रादुर्भाव आढळतो. अंड्यातून निघालेल्या अळ्या सामूहिकपणे पानाचा हिरवा भाग खात असल्याने पाने जाळीदार होतात. मोठ्या अळ्या पानाच्या कडेने खातात. अळी कळ्या, पुले व बोंडसुद्धा खाते. या अळीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकापेक्षा तुलनात्मक कपाशीवर कमी दिसून येतो. 
पीक वाढीची अवस्था, कीड प्रादुर्भाव स्थितीनुसार सल्ला -
१) पेरणीनंतर ६० ते ९० दिवस -
बोंडअळी - २० झाडावर १ किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पात्या किंवा बोंड प्रति झाड आढळल्यास, क्लोरअँट्रानीलिप्रोल (१८.५ एससी) ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 
२) पेरणीनंतर ९० ते १२० दिवस -
बोंडअळी - २० झाडांवर १ किंवा त्यापेक्षा अधिक क्षतीग्रस्त पात्या किंवा बोंड प्रति झाड आढळल्यास, (फवारणी - प्रति १० लिटर पाणी)
फ्लूॅबेन्डियामाईड (३९.३५ एससी) २.५ मि.ली. किंवा
इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) ०.५ मिली. किंवा
स्पिनोसॅड (४५ एससी) ३.५ मिली 
- मागील वर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्यास ५० मीटर अंतरावर एक याप्रमाणे एकरी ५ कामगंध सापळे लावावेत. त्यातील गॉसिप्ल्यूर दर १५-२० दिवसांनी बदलावा.
- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त फुले किंवा बोंडात जिवंत अळ्या असल्यास किंवा गुलाबी बोंडअळी नर पतंग ८ प्रति सापळ्यात सलग ३ रात्री सापडल्यास, (फवारणी - प्रति १० लिटर पाणी)
थायोडीकार्ब (७५ टक्के डब्ल्यूपी) २० ग्रॅम किंवा
क्विनॉलफॉस (२५ टक्के एएफ) २५ मिली किंवा
प्रोफेनोफॉस (५० टक्के ईसी) २० मिली 

गुलाबी बोंडअळी -
- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त फुले किंवा बोंडात जिवंत अळ्या असल्यास किंवा गुलाबी बोंडअळी नर पतंग ८ प्रति सापळ्यात सलग ३ रात्री सापडल्यास, (फवारणी - प्रति १० लिटर पाणी)
फेनव्हलरेट (२० टक्के ईसी) १० मिली किंवा
सायपरमेथ्रीन (१० टक्के ईसी) १० मिली 
- तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव असल्यास अंडीपुंज व अळ्यांचे समूह पानासहित हाताने गोळा करून नष्ट करावेत.
- निंबोळी तेल ५ मिली प्रतिलिटर + ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टिन आधारित कीटकनाशक (५० हजार पीपीएम) १ मिली + धुण्याचा सोडा १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- अत्यावश्‍यक भासल्यास, (फवारणी - प्रति १० लिटर पाणी)
क्लोरअँट्रानीलिप्रोल (१८.५ एससी) ३ मिली किंवा
नोव्हॅलुरॉन (१० टक्के इसी) १० मिली
Source:
केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या