Ticker

6/recent/ticker-posts

"माणसातला देव माणूस गरिबांचा डॉक्टर." डॉ.बाळकृष्ण अहिरे सर

"माणसातला देव माणूस गरिबांचा डॉक्टर." डॉ.बाळकृष्ण अहिरे सर.शब्दांकन/लेखन:- प्रविण वाटोडे 

काजीसांगवीः उत्तम आवारे

   असामान्य पराक्रम होतात ते असामान्य कार्याच्या सिद्धीसाठी केलेल्या प्रयत्नांतूनच होतात.संपत्तीच्या लोभाने जे जगतात अन् मरतात त्यांची नोंद

ठेवावी,असे इतिहासाला वाटत नाही.पण या 'उपरही' काही माणसं असतात समाज हिताच्या ध्येयाने पछाडलेली,प्रेरित झालेली.आपल्या स्वतःच्याच हिताचा विचार न करता समाज हिताचा प्रथम विचार करणारी.समाजहित,राष्ट्रहित जोपासणारी.आपल्या 'कर्मातच' मनुष्याच्या देवत्वपणाचा ठाव घेणारी.मनुष्याच्या हृदयात प्रवेश करून त्यांना आपलंसं करणारी आणि त्यातीलच एक व्यक्तीमत्व म्हणजे डॉ.बाळकृष्ण अहिरे सर.

            आजच युग खर तर खाजगी वैद्यकीय व्यवसायाच.आजच्या काळात खाजगी वैद्यकीय व्यवसाय यशाच्या परमोच्च स्थानी आहे.बरेच जण सरकारी दवाखान्यात जाण्याचं देखील टाळतात.पण अशाही काळात या युगात फक्त 'रुग्ण सेवाच हिच खरी मानवतेची सेवा' या तत्त्वावर चालून डॉ.अहिरे सरांनी सरकारी दवाखान्याचा 'चेहराच' बदलून टाकला आहे. आज डॉ.बाळकृष्ण अहिरे सर ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे 'स्त्रीरोग तज्ञ' म्हणून कार्यरत आहेत.आज खूप कमी शासकीय डॉक्टर आहेत की ज्यांच्यावर रुग्ण अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतात,ज्यांच्या कडे बघून रुग्णांच्या मनात सुरक्षेची भावना उत्पन्न होते.असे निवडकच डॉक्टर असतात.आज डॉ.अहिरे सरांनी स्व-सामर्थ्यावर स्व-कर्तुत्व सिध्द करून आपल्या नावाभोवती प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञाबरोबरच गोर-गरीबांची सेवा करून "माणसातील देव,गरिबांचा डॉक्टर" अशी ख्याती मिळवली आहे.सरांना हा मानाचा सर्वोच्च 'किताब' लोकांनीच बहाल केला आहे.
        डॉ.अहिरे सरांनी ही ख्याती काही एका रात्रीत मिळवलेली नाही.त्यासाठी अथक परिश्रमाची पराकाष्ठा, जिद्दीने हिंमतीने संकटाच्या पुढे उभं राहून त्यांना चिरण्याच्या सामर्थ्याच्या बळावरच हे सर्व शक्य झालं.     

        कोणाचे तकदीर कोठे चमकेल आणि कोणाचे नशीब कुठे गोते खाईल, कोणी सांगावे? काहीजण सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्म पावतात, तर काहीजण कष्टाने वा केवळ अपघाताने तकदीरचे शहेनशहा बनतात. मात्र जेव्हा बालपणी एखाद्या राजपुत्रासारखं जीवन जगत आलेला भाग्यवंत अचानक सर्वस्व गमावून बसतो, तेव्हा त्याच्या परवडीला, दु:ख-दैन्याला पारावार उरत नाही! 

        डॉ. बाळकृष्ण अहिरे सरांचं देखील तसच झालं.इसवी सनाच्या 20व्या शतकाच्या सत्तराव्या दशकात सरांचे वडील हे विद्युत महामंडळात शासकीय नोकरीत होते.ज्या काळात शिक्षणाची 'गंगा' खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी खूप अवकाश होता, नव्हे तर शिक्षित मुलगा नोकरीस मिळणे देखील कठीण होते.अशा काळात एखाद्या घरचा मुलगा शासकीय सेवेत असणे ही काही साधी गोष्ट नाही.ही असामान्य गोष्ट.पण एक दिवस नियतीने आपली चक्र फिरवली.होत्याच नव्हतं केलं.ज्यांच्या कुशीत झोपल्यावर शांत झोप लागायची.सुरक्षिततेची जाणीव व्हायची.ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळताना कशाचीही 'तमा' नसायची ,असे सरांचे वडील सरांच्या बालवयात त्यांना व त्यांच्या कुटुंबाला सोडून गेले.

     या नियतीच्या वज्राघाताने अहिरे कुटुंबाचे कंबरडे मोडल्यासारखे झाले. ही बातमी जेंव्हा सरांच्या आईला समजली तेंव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.धरणीकंपाचा हादरा निघून जावा आणि तरीही जमीन थरथरत राहावी, तशी शोकमग्न अवस्था आईचीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची झाली होती.

        या एका घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर खूप मोठा आघात झाला होता.तापलेली काच तडकून फुटावी आणि तिचे तुकडे सर्वदूर पसरावे तस् सरांचं घर-कुटुंब विखुरलं गेलं.तरीही सरांच्या आईंनी त्यांच्या मूळ गावी दावचवाडी ता.निफाड जि.नाशिक येथे वास्तव्य करण्याचं ठरवलं.आता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आईवर आली होती.संपूर्ण कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे,हे काही साधे काम नव्हते.परंतु आहे त्या परिस्थितीत एखाद्या चिमणीने लडिवाळाने आपल्या घरट्यात पिल्लू वाढवावे, तसेच सरांच्या आई आपल्या मुलांना जीव लावून आपल्या मुलांचं पालन पोषण करत होत्या.

        दिवसामागून दिवस सरत होते,तसे सर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल प्राथमिक शिक्षण घेत होते.शिक्षण कसलं? कसतरी इतर जण शाळेत जातात म्हणून जायचं.दुपारी शाळा सुटली की आपल्या यार-दोस्तासोबत खेळायचं आणि भूक लागली की घरी येवून जेवायचं.हा असाच नित्य दिनक्रम चालू असायचा.आता बघता बघता गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शेवटचा वर्ग संपला.आता पुढील शिक्षण जर घ्यायचे असेल तर तालुक्याच्या ठिकाणी निफाड येथे जावं लागणार होतं.पण सरांना सध्या शिक्षणात गोडी नव्हती आणि असही तालुक्याच्या ठिकाणी जावून शिक्षण घेणं हे आर्थिकदृष्ट्या परवडणारंही नव्हतं,तशी घरची परिस्थितीही नव्हती.एकटी आई कष्ट करून करून तरी किती करणार?घरात जेवणाच बघणार की मुलांच्या शिक्षणाचा बघणार?

    कुटुंबाची आबाळ होवू नये म्हणून सरांनी शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला.पण आता सरांचा हा निर्णय नियतीला मान्य नव्हता.कदाचित नियतीला दुर्दम्य इच्छा शक्तीच्या ह्या विद्यार्थ्यास शिक्षणाच्या ज्ञानामृतापासून दूर जावू द्यायचं नव्हतं,म्हणून की काय निफाडच्या #न्या.रानडे विद्या प्रसारक मंडळाने आपली एक शाखा #दावचवाडी येथे सुरू केली आणि त्या ज्ञानामृत पाजणाऱ्या शाखेच नाव होत #योगेश्वर विद्यालय.

        ही नवीन शाळा गावात सुरू झाल्यामुळे सरांच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली.या शाळेमुळेच शिक्षणाची गोडी लागू लागली.  एखाद्या महाकाय अजस्त्र काळयाभिन्न पाषणामधून एखादं रोपटं उगवावं तस सरांच्या मनात शिक्षणाचं एक रोपटं उगवत होतं. रोवलं जात होतं. जस एखाद्या रोपट्याला वेळेवर  खतपाणी,पोषकतत्वे व त्या रोपट्याची मशागत केली की त्या रोपट्याच थोड्याच दिवसात एका महाकाय वृक्षात रूपांतर होतं अगदी तसचं #योगेश्वर #विद्यालयात सरांच्या बुद्धीची मशागत व ज्ञानाची पोषकतत्वे देवून अजस्त्र महाकाय व्यक्तिमत्वाची पायाभरणी केली जात होती.

      आता सरांना शिक्षणाची आवड लागली होती.सर वर्गात हुशार असल्यामुळे शिक्षकांचाही त्यांच्यावर जीव होता. काळयाभोर जंगलामधून,डोंगर-दऱ्यामधून जंगलाच्या राजानेच रस्ता दाखवावा तसे #योगेश्वर विद्यालयातील शिक्षक बालवयातील डॉ.अहिरे सरांना मार्गदर्शन करीत होते.सर देखील रात्रीचा दिवस करून शिक्षकांनी सांगितलेल्या मार्गावर चालत होते.

      या अभ्यासातूनच,मेहनतीतूनच एखाद्या तडफदार अश्वाने आपल्या धन्याला घेवून ओढ्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला लांबलचक उडी मारावी अन त्या ओढ्याचं 'पात्र' पार करावं,तशी सरांनी इयत्ता दहावीची परीक्षा 1992 साली विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण केली.

        रात्र-पहाट करून केलेल्या मेहनतीला फळ आले होते.अजस्त्र सागराच्या,महाकाय समुद्राच्या पोटात जशी भरतीची लाट येते तशी एक नवीन लाट सरांच्या मनात आली होती.आता थांबायचे नव्हतं.यशाचा नवीन डोंगर पादाक्रांत करायचा होता,म्हणून सरांनी आपलं पुढील अकरावी बारावीच शिक्षण पूर्वीच्याच संस्थेच्या निफाडस्थित #वैनतेय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये घेण्याचं ठरवलं.पण प्रवेश कसा घेणार त्यासाठी सरांकडे कोणतीच आर्थिक तजवीज नव्हती.त्याकाळी या संस्थेची प्रवेश फी 1600 रुपये इतकी होती.पण अंगावरच्या फाटक्या कपड्यानिशी ज्ञानसागराच्या सळसळत्या लाटात पोहण्यासाठी निघालेल्या या नावाड्याजवळ फी भरण्यासठी पैसेच नव्हते. एखाद्या मच्छिमाराने जाळे टाकून मास्यांना अडकावे तसे सर नियतीच्या या जाळ्यात पुरते अडकले होते.ही बातमी गोर-गरिबांसाठी स्थापन झालेल्या निफाड येथील #शांतीलालट्रस्ट च्या संचालक मंडळाला समजली. समुद्र किनाऱ्यावरच्या तापलेल्या वाळूवर एखादा जिवंत मासा पडावा,उष्ण वाळूमुळे त्याच्या अंगाची लाही लाही व्हावी.मग त्याच्या नेत्रांनी थंडगार पाण्याचा शोध घ्यावा. तस #शांतीलालट्रस्ट च्या संचालक मंडळानी ज्ञानपिपासू,कुशाग्र बुध्दीमत्तेच्या या विद्यार्थ्यास #वैंनतेयविद्यालयाच्या ज्ञानाच्या अथांग सागरात यथेच्छ पोहता यावं म्हणून संपूर्ण फी भरली व ज्ञानामृत प्राशन करण्यासाठी सोडून दिलं.

        दावचवाडी ते निफाडच अंतर बारा-तेरा किलोमीटरचे.आर्थिक कारणांमुळे निफाडमध्ये राहणे देखील शक्य नव्हते म्हणून सरांनी बसने पास काढून ये-जा करण्याचं ठरवलं.त्याकाळी दावचवाडी ते निफाड पासचे भाडे अवघं 50 रुपये होतं.पण सरांजवळ पास काढण्यासाठी 50 रुपये देखील नव्हते.ही गोष्ट प्राचार्य वि.दा.व्यवहारे सरांना समजली त्यांनी आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांस एकदाच पाच महिन्यांची बसची पास काढून दिली व दर पाच महिन्यांनी पाच-पाच महिन्यांची पास काढून देत राहिले. म्हणतात ना चांगल्या विद्यार्थ्यास शिक्षक नेहमीच निःस्वार्थ जीव लावतात.

     सरांनी देखील आपल्या शिक्षकांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जसा भुकेला सिंह आयाळ पसरवीत आपल्या शिकारीवर तुटून पडावा, तसे डॉ.अहिरे सर  चवताळून त्या अभ्यासावर तुटून पडले.रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करत होते.बघता बघता बारावीची परीक्षा झाली.वर्ष होत 1994 सालाच.निकाल हाती आला. त्या आसमंतालाही आपली उंची कमी वाटावी तस सरांनी यश संपादन केलं.केलेल्या मेहनतीला फळ आलं होतं. ज्या रोपट्याची मुळे बळकट असतात, ते रोपटे काळया पाषाणावर फेकले तरी उभे राहते.पसरते.

        सरांना PCM (फिजिक्स,केमिस्ट्री,मॅथ्स)ग्रूपमध्ये 94 टक्के मिळाले होते म्हणून सरांनी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं. इंजिनिअरिंगला प्रवेश देखील घेतला. परंतु आपल्या मुलासारख्याच सरांना जीव लावणाऱ्या शेख मॅडम यांनी "तेरे लिये मेडिकल अच्छा रहेगा.तू मेडिकल को एडमिशन ले." असं म्हणत सरांना इंजिनिअरिंगचे एडमिशन कॅन्सल करून मेडिकलला प्रवेश घ्यायला लावला.एखादी पक्षिन आपल्या पिलास जशी जीव लावते तसा शेख मॅडमचा आपल्या लाडक्या विद्यार्थ्यावर जीव होता. शेख मॅडम ओझर वरून ये-जा करायच्या.ती बस दावचवाडी वरूनच जात होती. त्यामुळे शेख मॅडम व डॉ.अहिरे सर एकाच बसने ज्यायचे.त्याचा फायदा अहिरे सरांना खूप झाला.मॅडम बसमध्ये देखील सरांना मार्गदर्शन करायच्या.

      आता शेख मॅडमने सांगितले म्हणून सरांनी मेडीकलला एडमिशन घेतले पण मेडिकल म्हणजे काय तर फार्मसी, 'म्हणजे जो कोर्स केल्यावर औषधांच दुकान टाकता येतं' असा सरांचा समज होता.पण आपले शिक्षक आपलं कधीच वाईट करणार नाहीत,असा अगाध विश्वास सरांचा आपल्या मातृतुल्य शेख मॅडमावरती होता.शेख मॅडममुळेच समाजाची सेवा करण्यास असे निष्णांत,हरहुन्नरी डॉक्टर मिळाले आहेत.

           सरांनी इसवी सनाच्या 1994 साली  एम.बी.बी.एस साठी पुण्याच्या नामांकित अशा #बीजेमेडिकल कॉलेज(#BJGovernmentMedical) ला प्रवेश मिळवला. हे महाविद्यालय इंग्रज शासनाच्या काळातील इसवी सन 1878 साली #बीजे वैद्यकीय शाळा या नावाने सुरू झाले होते.या वैद्यकीय शाळेचे सुसज्ज,अजस्त्र अशा महाकाय वटवृक्षात रूपांतर होवून इसवी सन 1946 मध्ये महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला.याच महाविद्यालयाने देशाला पारंगत,निष्णांत,नामांकित असे अगणित डॉक्टर दिलेले आहेत.

       जवळपास दीडशे वर्षांची वैद्यकीय शिक्षण शिकवण्याची परंपरा,ज्वाजल्य इतिहास असणाऱ्या वैद्यकीय शिक्षण संस्थेत डॉ.अहिरे सर आपलं शिक्षण घेत होते.आपलं अंगिगत कौशल्य विकसित करीत होते. झोपडी असो वा महाल! एकदा उंदरांनी भिंतींना बीळ पाडलं आणि कुरतडायला सुरुवात केली, की सुखाची झोप कशी येणार? तसच सर देखील आपलं कर्तुत्व सिध्द केल्याशिवाय सुखाची झोप तरी कशी घेणार होते.

         सरांनी आपलं एम.बी.बी.एस चं पहिलं वर्ष त्यांना मिळालेल्या शिष्यवर्तीवर कस बस पूर्ण केलं.परंतु द्वितीय वर्ष आर्थिक संकटामुळं फार जिकिरीचं जावू लागलं होतं.कधी कधी उपाशी राहून दिवस काढावे  लागत होते.मग सरांनी कळवळून आपल्या मामास पत्र लिहिले.सरांचे मामा जे.बी.यशवंते हे मूळ आडगाव ता.चांदवड जि.नाशिक येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे इंडियन ऑईल कंपनीमध्ये डेप्युटी मॅनेजर या पदारवती कार्यरत होते.त्यांची नुकतीच गुजरात मधील 'आनंद' येथे बदली झाली होती.ते एक दिवस घरामध्ये बसलेले असताना पोस्टमन सरांनी लिहिलेले पत्र घेवून आला.मामांनी पत्र हातात घेतले.घाईघाईने पत्र उघडले.ते पत्र वाचताना देवाच्या गळ्यातील मोतीमाळेचा दोरा जीर्ण व्हावा, आणि एका पाठोपाठ एक सारे मोती घरंगळून खाली पडावेत, त्याप्रमाणे एका बाजूने मामांच्या डोळ्यांतून अश्रूपात सुरू होता.अश्रुंच्या धारेमुळे डोळे लालबुंद झाले होते.आपला भाचा कोणत्या संकटात आहे याची त्यांना जाणीव झाली होती.मग त्यांनी आपल्या लाडक्या भाच्यास दर महिन्याला 400 रुपयाची मनिऑर्डर करण्याचा निर्णय घेतला.सरांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मामांची मनिऑर्डर दर महिन्याला न चुकता पोहचत होती.

          आपला भाऊ खूप अडचणीत आहे.माझा लाडका भाऊ दोन वेळेचं साधं जेवणही घेवू शकत नाही. उपाशी पोटी त्याच शिक्षण घेणं चालू आहे.ही बातमी सरांच्या ताईला समजली. एखाद्या कड्यावरून भव्य पाषाणमूर्ती खाली कोसळावी त्याचप्रमाणे ताई पाय नसल्यासारखे खाली गळून पडल्या. त्यांना मूर्च्छा आली म्हणावी तर डोळे सताड उघडे, ना आली म्हणावे तर कोणतीच हालचाल नाही! मग ताईंनी व भाऊजींनी ताईंचे सर्व दागिने गहाण ठेवून सरांना पैसे पाठवून दिले. दावचवाडी गावातील सुजाण नागरिकांनी व सरांच्या मित्रांनी देखील जमेल तशी सरांना आर्थिक मदत केली.

          सरांची कुशाग्र बुद्धी #बिजेमेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांपासून लपून राहिली नाही.आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांस त्यांनी केंव्हाच हेरले होते.तेथे सटाणा जिल्हा नाशिक येथील मूळ रहिवाशी असणाऱ्या प्राध्यापक #डॉ.पद्माकर पंडित सरांचा तर अहिरे सरांवर तर खूप जीव होता. प्रसंगी #डॉ.पंडित सर अहिरे सरांना आर्थिक मदत देखील करत असत.त्यांचा लाडका विद्यार्थी देखील त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी आपल्या जिवाचं रान करत होता.झटत होता.झगडत होता.

        एक दिवस प्रयोगशाळेत प्रयोग चालू होता.सर नेहमीसारखे पायात स्लीपर चप्पल घालून प्रयोगशाळेत गेले.तेथील प्राध्यापकांनी सरांना "प्रयोगशाळेत येताना पायात शुज किंवा बूट घालून येत जा" असे सांगितले. हे शब्द कानी पडताच एखाद्या लोहाराने तीक्ष्ण कट्यार भात्यात गरम करून लालबुंद करावी आणि ती आपल्या काळजात खुपसवावी अशा वेदनेची अवस्था अहिरे सरांची झाली होती.कारण सरांजवळ शूज किंवा बूट घेण्यासाठी पैसेच नव्हते.

         पाठीचा कणा मोडलेल्या माणसासारखी त्यांची अवस्था झाली होती. त्यांना दरदरून घाम फुटला होता.पुढं काय करावं काही सुचत नव्हते.तेंव्हा त्यांनी आपल्या मोठ्या बंधूंना ही हकीकत सांगितली.सरांचे मोठे बंधू कापड दुकानात काम करून सरांना शिक्षणासाठी पैसे पाठवत होते. मग त्यांच्या बंधूने त्यांच्या सोबत दुकानात काम करणाऱ्या व शूज वापरत असणाऱ्या मित्राकडून जुने शूज घेवून सरांना पाठवून दिले.नियतीनं देखील किती परीक्षा घ्यावी. एखादं वस्त्र फाडून त्याचा एक एक तुकडा बाजूला काढावा, तसं त्या नियतीनं एक झालं की एक संकट सरांपुढे उभं केलं होतं.

       पण ज्यांच्या मनामध्ये तुफान वादळवारा,गर्द अंधाराला चिरण्याची धमक,हिम्मत,जिगर असते त्यांना ही संकटं तरी किती काळ अडवणार? ही संकटं देखील अशा जिगरबाज,लढवव्या सेनानी समोर आपली नांगी खाली जमिनीवर टाकणारच ना? सरांनी अनंत अडचणीवर मात करून आपलं एम.बी.बी.एस. चं शिक्षण इसवी सन 2000-01 मध्ये पूर्ण केलं. आता थांबायचं नव्हतं अजून उच्च शिक्षण घ्यायचं होतं.पण पुन्हा अडसर आला तो पैस्यांचा. सरांनी आधीच अगणित अडचणीवर मात करून आपलं शिक्षण कसबस पूर्ण केलेलं.त्यात परत आता दोन वर्ष एम.डी. चे शिक्षण कसं घ्यावं.आर्थिक जुळवा-जुळव कशी करायची? हा मोठा प्रश्न सरांपुढे उभा होता.म्हणून त्यांनी शासकिय वैद्यकिय सेवेत जाण्याचं ठरवलं.

           बघता बघता वर्षा मागून वर्ष सरत होती.सर आपल्या मनाची घालमेल मनातच दाबत नौकरी करत होते.अजूनही मनात उच्च शिक्षण म्हणजे एम.डी.करण्याची आस होती,आसक्ती होती.मनात उर्मी होती.नोकरीतून मन सैरभैर धावत होतं.फासेपारध्यांच्या जाळ्यात पक्षी अडकावेत, तशी त्यांची आतल्या आत फडफड सुरू झाली होती.शासकीय सेवेची पाच वर्ष होत आली होती.

       तेंव्हा इसवी सन 2005 मध्ये सरांचा विवाह लामणदिव्यातल्या ज्योतीसारख्या तेजस्वी,प्रेमळ,शीतल,कर्तव्यदक्ष आणि सर्वसमावेशक व्यक्तीमत्त्व असणाऱ्या डॉ.त्रिरश्मी मॅडम (Trirashmi Balkrishna) सोबत पार पडला.परत अंगावरती जबाबदारी आली.दोन वर्षांनी म्हणजे 2007 साली 'अनुच्या' रूपाने सरांना कन्यारत्न प्राप्त झाले. अनुमुळे सरांच्या हृदयात नवचैतन्य निर्माण झाले होते.तिच्या दुडूदुडू पावलांनी अवघं घर न्हावून निघत होते.तिच्या लडिवाळ इवलाशा हातात सारा आसमंत भेटल्यासारखा सरांना वाटत होता.

          दोन-तीन वर्ष सरले.पण काही केल्या सरांचं मन सरांना स्वस्थ बसू देत नव्हते.एकमेकांच्या सोंडेत सोंड घालून चिखलात दोन हत्ती फसावेत,एकाने सोडले तर दुसरा चिखलात कायमचा रुतून बसावा अशी अवस्था सरांची झाली होती.काळ पुढे सरकत होता.तसे सर बैचेन होत होते.आता त्यांना आपलं उच्च शिक्षण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचं होतं.

       बऱ्याच उशिराने वेदनेने जर्जर झालेला सिंह आपली आयाळ पिंजारत गर्जून उठावा,तसा सरांनी रात्र दिवस अभ्यास करून,मेहनतीची पराकाष्ठा करून तब्बल पंधरा वर्षांनी एम.डी. साठी म्हणजे उच्च शिक्षणासाठी देशात इसवी सन 1845 साली स्थापन झालेल्या,एक वेगळं नावलौकिक मिळवलेल्या,आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलेल्या देशातच नव्हे तर जगात अग्रगण्य असणाऱ्या #ग्रँटमेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला.पाऊने दोनशे वर्षापासून #ग्रँटमेडिकल कॉलेज व #जेजेरुग्णालय समूह ही वैद्यक शास्त्रातील नावाजलेली संस्था आहे. ही संस्था आशिया खंडातील पाश्चात्य औषध शिकवणाऱ्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे.अशा या महाकाय संस्थेत सरांनी उच्च शिक्षण घेवून,सर त्यामधे देखील विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले.सरांनी दुर्दम्य इच्छशक्तीच्या बळावर आपलं स्वप्न पूर्ण केलं होतं.या जगात कुठलीही गोष्ट अशक्य नसते हे सरांनी आपल्या कर्तुत्वातून दाखवून दिलं.सिध्द करून दाखवलं.

          समुद्रातील महाकाय भोवऱ्याच्या चक्रात एखादा ओंडका अडकावा आणि तेथेच गरगर फिरत राहावा, तसे डॉ.अहिरे सरांचे मस्तक एम.डी. ह्या एकाच विषयाच्या भोवऱ्यात इतके दिवस गरगरत होते.ते त्यांनी एखाद्या जिगरबाज योद्ध्याप्रमाणे पूर्ण केले.आता डॉ.अहिरे सर स्त्री-रोगात तज्ञ झाले होते.यात सरांच्या नेहमी सुख-दुःखात सहभागीच नव्हे तर त्यांच्या सोबत राहणाऱ्या त्यांच्या पत्नी डॉ.त्रिरश्मी मॅडमांचा देखील सिंहाचा वाटा होता.सर दोन वर्ष शिक्षणासाठी गेले असताना त्यांनी एखाद्या रणांगिनीसारखी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी निपुणतेने सांभाळली होती.

        संकटांचे काटेरी रस्ते तुडवताना आणि आपल्या रक्तबंबाळ बोटांनी छिन्नी-छित्रीने आपल्या अजस्त्र व्यक्तिमत्वाचं शिल्प घडवताना सरांच्या आईंनी आपल्या लाडक्या बाळकृष्णाला खूप जवळून पाहिले होते.रात्र रात्र जागतांना पाहिलं होतं.संकटाशी झगडताना,दोन हात करतांना पाहिलं होतं. आईला आपलं बाळ आयुष्यात यशस्वी व्हावं,या पेक्षा वेगळी काय ती अपेक्षा असते? 

      एखाद्या मुर्तीकाराने काळया पाषाणातून छिन्निने डागून एक सुंदर मूर्ती आपल्या नजरेसमोर उभी करावी तस सरांनी आपल्या सर्वांच्या नजरेसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे.सर्व सुख-सुविधा उपलब्ध असताना अभ्यासाच्या नावाने बोंब ठोकणाऱ्या आजच्या विद्यार्थ्यांसाठी तर सरांचं आयुष म्हणजे धगधगता ज्वालाच आहे.सरांचं संघर्षमय आयुष्य म्हणजे जळत्या,भडकत्या चुलाण्यावरची ती उकळलेली काहीलच होती जणू! 

         खर तर माझा आणि सरांचा परिचय मागील चार-पाच वर्षांपासूनचा.माझ्या आणि सरांच्या वयातील अंतरही नदीपात्राच्या दोन टोकातील अंतराऐवढे.सरांनी जेंव्हा एम.बी.बी.एस ला एडमिशन घेतलं त्यानंतर मी चार वर्षांनी पहिलीला प्रवेश घेतला होता.पण आमच्या वयात एवढं अंतर असतांना ते सरांनी कधीच जाणवू दिलं नाही.माणसं जिंकून घेण्याची कला सरांनी कुठून अवगत केली? हा मोठा शोधाचा विषय आहे.ज्यांनी आयुष्यात पावलो-पावली एवढ्या 'ठेचा' खाल्लेल्या आहेत त्यांना माणसांना आपलंसं करण्याचं कसब आत्मसात होणारच ना? 

       आज डॉ.अहिरे सर ग्रामिण रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ञ आपली सेवा देत आहेत. सर आपल्या रुग्णांचे अर्धे दुखणे तर आपल्या सुमधुर बोलण्यानेच गायब करतात.म्हणूनच की काय फार दुरू वरून रुग्ण सरांकडे उपचारासाठी येत असतात.सर सर्व रुग्णांना उच्च प्रतीचा उपचार देत असतात.ते कितीही उशीर झाला तरी शेवटच्या रुग्णाला उपचार दिल्या शिवाय त्याला तपासल्या शिवाय आपली कॅबिन सोडत नाहीत.कधी कधी सरांच्या सकाळच्या जेवणाला दुपारचे चार वाजत असतात.सरांच्या अंगात कुठून येत असेल एवढी ऊर्जा?ज्यांच अख्खं जीवनच चुलांगण्यातील निखाऱ्या सारखं धगधगतं राहिलं आहे, त्यांना आपलं कार्य,लोकांची,गरीबांची सेवा करण्यासाठी ही भूक तरी कशी अडवणार?

      सरांनी मला एकदा सांगितलं होत "माझ्या विषयी लिखाण करू नका." पण काळया गर्द अंधाऱ्या  जंगलाच्या झाडीमधून जंगली पिशाच्चांना चुकवत एखाद्या पाडसाने आपला रस्ता,मार्ग शोधावा तसा सरांनी अनंत अडचणीवर मात करून आपला जीवनरुपी आदर्श समाजासमोर ठेवला आहे.म्हणूनच हा लेखनप्रपंच करण्याचा मानस.असही काळ किती दिवस अशा पराक्रमी योध्याचं कर्तुत्व आपल्या पोटात ठेवणार.आपल्या सामर्थ्यावर,जिद्दीवर इतिहासालाही नोंद घ्यायला लावणारे व्यक्तिमत्व खूप कमी असतात.

          ज्या मातेनं सरांना घडवण्यासाठी लोकांच्या शेतात मोलमजुरी केली,दुसऱ्यांच्या शेतात काबाडकष्ट केले त्यांच्या मेहनतीचं सरांनी खऱ्या अर्थाने चीज केलं.आज सर आपल्या मातेला विमानाने परदेशवारी घडवतात.दुसऱ्याच्या शेतात रक्त आटवताना आकाशातून जर एखादे विमान जात असेल तर नवलाईने त्या विमानाकडं बघताना त्या विमानात आपण देखील एक दिवस बसू! अशी कल्पना त्या मातेनं कधी केली असेल काय?  चांगल्या यशाची आणि आशीर्वादाची प्राप्ती कष्टाच्याच मार्गाने होते! खरचं नशीब बदलण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही.सरांच्या डोळ्यांत निखाऱ्यासारखी जळणारी बुबळे त्यांचा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक पाऊल जणू मुक्यानेच सर्वांना सांगत राहते- “आता बांबायचं नाही... आता थांबायचं नाही!     


            असला कर्तबगार पुत्र समाजाच्या सेवेसाठी अर्पण करणाऱ्या मातेच्या चरणी नतमस्तक.


शब्दांकन/लेखन:- प्रविण वाटोडे 

शिवव्याख्याते,निवेदक व आरोग्य कर्मचारी,आरोग्य विभाग चांदवड,जिल्हा नाशिक.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या