Ticker

6/recent/ticker-posts

कडूनिंब : पृथ्वीतलावरील सुवर्ण वृक्ष

 कडूनिंब : पृथ्वीतलावरील सुवर्ण वृक्ष

संकलक

 राजेश डवरे  तांत्रिक समन्वयक कृषी महाविद्यालय रिसोड (करडा) तथा कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिमकडूनिंब : पृथ्वीतलावरील सुवर्ण वृक्ष

             (भाग १)

शेतकरी बंधुंनो पैसे काय झाडाला लागतात? अशा उक्तीचा आपण बऱ्याच वेळा वापर करतो आणि खरोखरच आहे की पैसे झाडाला लागत नाहीत.परंतु आपण बारकाईने खोलवर विचार केला तर आपल्या लक्षात येईल खरोखरच पृथ्वीतलावर मानव जाती करिता सुवर्ण वृक्ष म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल असा वृक्ष म्हणजे कडूनिंब होय . कडुनिंबाचा उल्लेख गरिबांचा धन्वंतरी किंवा खेड्यातील दवाखाना किंवा परकीय चलन मिळवून देणारा सुवर्णक्षण असा केला जातो. शेतकरी बंधुंनो कडुनिंबाचा  प्रत्येक भाग हा बहुगुणी व बहुपयोगी असून त्याचे व्यापारी तत्त्वावर सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण या पहिल्या भागात कडूनिंबा मधील विविध भागाचे उपयोग व महत्त्व तसेच सारांश रुपात कडुनिंबाच एक झाड मानवाला त्याच्या आयुष्यात सरासरी काय देणगी देऊन जातं या बाबी विषयी थोडे जाणून घेऊ या.

 (A) कडुनिंबाच्या विविध भागाचे उपयोग व महत्व

(१) कडुनिंबाची पाने : कडू निंबाच्या पानात अनेक औषधी गुणधर्म आहेत. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कडुनिंबाच्या पानाचा रस पितात किंवा पाने खातात. गजकर्ण, सूज ,हिवताप ,आतड्यातील बुरशी, इत्यादी व्याधीवर कडुनिंबाचा काढा प्रभावशाली असल्याचे आढळून आले आहे.जखमा लवकर भरून येण्यासाठी कडुनिंबाची पाने ठेचुन जखमेवर बांधतात. कडुनिंबाची पाने कडू व शीतकारक असतात. कडुनिंबाच्या पानांची पावडर तयार करून दंतमंजन म्हणून सुद्धा त्याचा उपयोग केला जातो.घरगुती धान्य दीर्घकाळ टिकण्यासाठी कडूनिंबाच्या पानाचा कीड प्रतिरोधक म्हणून उपयोग केला जातो. नैसर्गिक रित्या कडुनिंबाच्या पानगळी मुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढतात तसेच कडुनिंबाचा पाला, जमिनीत असणाऱ्या  किडीच्या कोषअवस्थेचा नाश करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतो. घरात कडुनिंबाची पाने जाळल्यास घरातून डास पलायन करतात.

(२) कडूनिंबाची फुले : शेतकरी बंधूंनो साधारणता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मे महिन्याच्या शेवटपर्यंत कडुनिंबाला चांगला मोहोर येतो. कडूनिंबाची फुले  कडू असतात व त्यांच्यात कफ नाशक गुणधर्म असतो. कडू निंबाच्या मोहराला असलेला वैशिष्ट्यपूर्ण रंग व गंध यामुळे मधमाशा मकरंद गोळा करण्याकरिता गर्दी करतात.

(३) कडूनिंबाची फळे किंवा बी :   कडुनिंबाच्या फळांमध्ये Azadirachtin, Melian triole, Nimbin and Nimbicidin, Salanin इत्यादी सक्रिय रासायनिक घटक किंवा अल्कलाईड असतात . कडुनिंबातील फळांमध्ये असणाऱ्या या सक्रिय घटकामुळे मानवास तसेच पिकांना हानिकारक किडीचा व रोगाचा प्रतिबंध मिळण्यास मदत  मिळते. कडुनिंबाच्या बियापासून किंवा फळापासून  बनवलेली अनेक कीटकनाशके बाजारात उपलब्ध आहेत व ती कीड व्यवस्थापनात  प्रभावी आढळून येत आहेत तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून व मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ती सुरक्षित आहेत. बरेच शेतकरी बंधू घरच्या घरी कडुनिंबाच्या बियाचा अर्क तयार करून त्याचा कीटकनाशक म्हणून सुद्धा वापर करतात. कडुनिंबाच्या बियापासून साधारणता वजनाच्या 50 टक्के तेल मिळते. हे तेल खूपच उपयुक्त असून औद्योगिक उत्पादनात या तेलास अनन्य साधारण महत्व आहे. शेतकरी बंधूंनो भारतात मुख्यता साबणाच्या उत्पादनात उत्पादनात कडुनिंबाच्या तेलाचा उपयोग होतो. याशिवाय टूथपेस्ट,  सौंदर्यप्रसाधन, विविध क्रीम ,हेअर ड्राय लोशन, शाम्पू नेल पॉलिश इत्यादी उत्पादनात कडुनिंबाचा मोठा वाटा आहे.तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या निंबोळी पेंडी मध्ये    शेनखतापेक्षा अधिक नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम व मॅग्नेशियम आढळते. सेंद्रिय खत म्हणून निंबोळी च्या पेंडचा चांगला उपयोग होतो. निंबोळी फळातील गर खाण्यासाठी तसेच मूळव्याधीवर उपचार म्हणून उपयोगात आणला जातो.

(४) कडुनिंबाची साल : शेतकरी बंधूंनो कडुनिंबाची साल सुद्धा बहुगुणी असून दंतरोग, हिवताप तसेच कावीळ वरील औषधाच्या निर्मितीसाठी कडुनिंबाच्या सालीत असणाऱ्या टॅनिन चा उपयोग करतात.

(५) कडुनिंबाचे लाकूड : शेतकरी बंधूंनो कडुनिंबाचे लाकूड सागाच्या लाकडावर प्रमाणे बळकट असल्याने इमारतीच्या बांधकामासाठी त्याचा उपयोग केला जातो. कडुनिंबाच्या लाकडापासून कोरीव कलाकुसर, दरवाजे ,शोभिवंत छत, सामानसुमान भरण्याची खोकी खेळणी ,शेतीची अवजारे फर्निचर इत्यादी बनवता येते. कडुनिंबाच्या लाकडाला सहजासहजी कीड लागत नाही किंवा पाण्यात ते लवकर कुजत नाही.

(६) कडुनिंबाचे खोड व फांद्या : शेतकरी बंधुंनो कडुलिंबाच्या खोडापासून निंबिन व निंबडीन हे घटक मिळतात. कडू निंबाच्या खोडावर जखमा केल्यास डिंकासारखा रस पाझरतो. या रसाचा उपयोग डिंकासारखा होत नसला तरी प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने दक्षिण आशिया मध्ये निम डिंक अन्नात वापरतात. दातांच्या आरोग्यासाठी कडूनिंब मौल्यवान आहे. सकाळी कडुनिंबाच्या हिरव्या काडीचा दंतमंजना सारखा उपयोग करून दात हिरड्या साफ करता येतात.

(७) कडूनिंबाची मुळे : शेतकरी बंधूंनो कडुनिंबाच्या मुळ्या ओसाड माळराने, खडकाळ जमिनी, डोंगर उतारावर च्या जमिनी ,खारवट नापीक जमीन,तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जमिनीत खोलवर जातात व पाणी शोषून घेतात व या मुळ्यांना इजा झाली तर पुन्हा फुटवे फुटतात. बंधुंनो या कडुनिंबाच्या मुळामध्ये असलेल्या वैशिष्ट्यामुळे कडुनिंबाचे झाड प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहते व आपल्याला त्याचा खरा फायदा मिळतो.


(B)   कडुनिंबाच एक झाड  त्याच्या सरासरी  आयुष्यात मानवाला काय देणगी देऊन जातात जात?

शेतकरी बंधूंनो सर्वसाधारणपणे सुरुवातीच्या पाच वर्षात कडुनिंबाची मुळे प्रथम खोलवर जमिनीत जातात आणि आणि त्यानंतर त्यांची खरी वाढ होते. कडुनिंबाच्या लागवडीनंतर साधारणता पाच वर्षानंतर चांगली फळधारणा सुरू होते. सर्वसाधारण आदर्श परिस्थितीत एक कडुनिंबाचे झाड तीस ते पन्नास वर्षे जगू शकत. मध्यम आकाराच्या आठ मीटर उंचीच्या दहा ते पंधरा वर्षाच्या कडुनिंबाच्या वृक्षापासून प्रतिवर्षी 50 किलो पानाचे उत्पादन 35 ते 50 किलो निंबोळी बी आणि आणि ताज्या निंबोळ्या पासून 45 ते 50 टक्के तेल मिळतं. एका पंधरा वर्षाच्या आदर्श कडुनिंबाच्या वृक्षापासून चारशे किलो जळाऊ लाकूड मिळते व या लाकडापासून  विविध वस्तू तयार करता येतात .

शेतकरी बंधूंनो वर निर्देशित सर्व बाबी मुळेच कडुनिंबाला सुवर्ण वृक्ष म्हणजे मौल्यवान देणगी देणारा वृक्ष म्हणून संबोधले जाते. पुढील भागात भाग २ मध्ये या कडुनिंबाचा पीक संरक्षणासाठी कसा उपयोग होतो ते पाहू तोपर्यंत धन्यवाद.

              संकलक

राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

----------------------------------------------------------------

कडूनिंब : पृथ्वीतलावरील सुवर्ण वृक्ष :  कडूनिंबाची पीक संरक्षणातील भूमिका

       ( भाग 2)

           संकलक

राजेश डवरे  तांत्रिक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड ( करडा) तथा कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम


  शेतकरी बंधूंनो कडूनिंब  पृथ्वीतलावरील सुवर्ण वृक्ष भाग १ मध्ये आपण कडुनिंबाच्या झाडातील  विविध भाग कसे बहुपयोगी आहेत व एक कडुनिंबाचे झाड आपल्या आयुष्यात मानवाला काय योगदान देऊन जातं याबद्दल आपण माहिती घेतली होती. आता आपण कडूनिंब या या वृक्षाची शेती आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी पिक संरक्षणातील भूमिका जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो कडूनिंबाची पानं व बिया मध्ये असलेली व मागील भागात उल्लेख केलेली विविध रासायनिक द्रव्य किंवा अल्कलाईड ही शेतकऱ्यांच्या विविध पिकांत संरक्षणाची भूमिका पार पाडण्यासाठी क्रियाशील घटक म्हणून कार्य करत असतात. सर्वप्रथम कडू निंबाच्या पानात व बियांमध्ये कोणती घटक असतात व व ती कशी कार्य करतात हे जाणून घेऊ. 

 ( A) कडुनिंबाच्या पानांमध्ये व बियांमध्ये असलेले घटक

(1) Azadirachtin : साधारणता एक ग्रॅम कडुनिंबाच्या बियांमध्ये दोन ते चार मिलिग्रॅम Azadirachtin  असते. या प्रमुख घटकामुळे किडी झाडापासून दूर राहणे पसंत करतात त्यांना अपंगत्व येते व किडीच्या जीवनचक्रात बाधा येते व किडींच्या जीवनचक्रात बाधा येते. साधारणता कीड व्यवस्थापनामध्ये  हा एकटा घटक  90% परिणाम कारक आढळून येतो.

(2) Nimbin and Nimbidin : या महत्त्वाच्या घटकांमध्ये पिकांवरील विषाणूजन्य रोगावर कार्य करण्याची शक्ती असते. त्यामुळे हा घटक पिकांवरील विषाणूजन्य  रोगाच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरतो.

(3) Melion triole : या घटकामुळे पिकांवरील किडी झाडांची पाने फुलं बोंड शेंगा इत्यादी इत्यादी खान बंद करतात. 

(4) Salanin : पिकांवरील पाने खाणाऱ्या किडी साठी हा घटक प्रभावी आहे

(5) Diasitil Azdirechtinol : कडुनिंबाच्या पानापेक्षा बियांमध्ये जैविक क्रिया करणारा हा घटक तीव्र असतो .त्यामुळे किडींच्या विविध प्रजातीवर  हा परिणाम कारक ठरतो व कीडीच्या शरीररचनेत व क्रियेत बदल घडवून किडी मध्ये अपंगत्व आणतो.


 ( B) कडुनिंबापासून  घरच्या घरी तयार करता येणारी कीटकनाशके


(a) कडुनिंबाच्या पानापासून  पानाचा अर्क तयार करण्याची पद्धत  : 

 कडूनिंबाची पाच ते सात किलो  स्वच्छ धुतलेली पाने पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात चांगली ठेचून बारीक करा व नंतर ही ठेचलेली  पाने दहा लिटर पाण्यामध्ये रात्रभर  भिजत ठेवा.  सकाळी स्वच्छ कापडातून हे द्रावण गाळून व पीळून घ्या व नंतर हे 10 लिटर द्रावण 90 लिटर पाण्यात टाकून एकूण शंभर लिटर द्रावण तयार करा व पिकावर फवारणीसाठी वापरा. या द्रावणासाठी मोठ्या प्रमाणात कडुनिंबाची पाने लागत असल्यामुळे कमी क्षेत्रावर असणाऱ्या पिकात याचा चांगला उपयोग करता येतो. या कडूनिंबाच्या पानाचा अर्कापासून पाने खाणारी अळी, नाकतोडे ,टोळ इत्यादी  कीटकांचे व्यवस्थापन करता येते.

(b)  निंबोळ्या पासून निंबोळी तेल काढून त्याचा कीड व्यवस्थापनासाठी  वापर करणे : उन्हात चांगल्या वाळलेल्या एक किलो निंबोळ्या घ्या. नंतर निंबोळी ची वरची साल काढून टाका. नंतर निंबोळीचा पांढरा गर ऊखळा मध्ये चून लगदा तयार करा. त्यामध्ये थोडे पाणी टाका. हा लगद्याचा गोळा एका परातीत चांगला थापा. त्यामुळे या लगद्याच्या पृष्ठभागावर तेल दिसेल .हा तेलाचा लगदा हाताने चांगला दाबून त्याचे तेल काढावे. गोळ्यातून थेंबाथेंबाने तेल पाझरते. गोळा पुन्हा पुन्हा तिंबुन हाताने दाबावा. गोळ्यातील तेल पूर्णपणे काढावे उरलेला गोळा पाण्यात टाकून उकळल्यास तेल पाण्यावर तरंगते ते चमच्याने काढून घेता येईल. ही ही थोडी कष्टाची घरगुती तेल काढण्याची पद्धत झाली. अर्थात तेल घाणी मधून अधिक प्रमाणात तेल मिळते. साधारणता एक किलो निंबोळी बियापासून 100 ते 150 मिली तेल मिळते. कडुनिंबाच्या तेलामध्ये  Azadirachtin ०.१५ टक्के, Salanin ०.५ टक्के, Acetol nimbin ०.१५ टक्के इत्यादी घटक असतात. पिकांवर येणाऱ्या रस शोषक किडी विशेषता काळी माशी पांढरी माशी व इतर पिकांवर शिफारशीप्रमाणे निंबोळी तेलाचा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापर करता येतो.

(c)  वाळलेल्या निंबोळ्या पासून पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत :  (१) शेतकरी बंधूंना दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या आधी प्रत्येक शेतकऱ्याने सर्वसाधारण सर्व पिकाकरिता कीड व्यवस्थापन करण्याकरता वापर करायचा आहे म्हणून किमान 50 ते 100 किलो निंबोळ्या उपलब्ध असताना जमा कराव्यात. नंतर ह्या निंबोळ्या चांगल्या वाळवून साफ करून साठवून ठेवाव्यात. 

(२) फवारणीच्या आदल्या दिवशी एक एकर क्षेत्र फवारणी करायची आहे असे गृहीत धरून पाच किलो वाळलेल्या निंबोळ्या कुटून बारीक कराव्यात.

(३) नंतर पाच किलो वाळलेल्या निंबोळी चा कुटून बारीक केलेला चुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी भिजत टाकावा. तसेच एक लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत ठेवावा.

(४) दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे फवारणीच्या दिवशी निंबोळीचा नऊ लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवलेला अर्क  फडक्यातून चांगला काढून घ्यावा. या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा सर्व अर्क एकूण दहा लिटर होईल एवढे पाणी टाकावे.

(५) वर नमूद केल्याप्रमाणे तयार केलेला एक लिटर अधिक नऊ लिटर साधे पाणी या प्रमाणात मिसळून ढवळून ढवळून फवारणीसाठी वापरावा. अशाप्रकारे निंबोळी अर्क फवारणी च्या दिवशीच तयार करून वापरावा.

(C) पाच टक्के निंबोळी अर्क कोणत्या पिकात कोणत्या किडी करता व  कोणत्या अवस्थेत वापरावा?  : शेतकरी बंधुंनो पाच टक्के निंबोळी अर्क सोयाबीन वरील सर्व पतंग वर्गीय किडी, कपाशी पिकावरील रस शोषणाऱ्या किडी तसेच सर्व प्रकारच्या बोंड अळ्या, तुरीवरील व हरभऱ्यावरील घाटे अळी, जवळ जवळ सर्व भाजीपाला  भाजीपाल्यावरील किडी, मुग , उडीद भुईमूग पिकावरील पतंग वर्गीय कीडी संत्रा वर्गीय पिकातील काळी काळी माशी यासह ह् अनेक प्रकारच्या पिकावर शिफारशीप्रमाणे शिफारसीत किडींच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा घटक म्हणून प्रभावीपणे वापरता येतो सर्वसाधारणपणे मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी कपाशीवरील बोंड आळी उंट आळी तंबाखू वरील पाणी खाणारी अळी ज्वारीवरील व मक्यावरील खोडकिडा टोमॅटोवरील व इतर भाजीपाल्यावरील कीडी यांच्याकरता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून गरजेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन योग्यवेळी पिकात पीक संरक्षणासाठी त्याचा वापर करावा.


(D) पाच टक्के निंबोळी अर्क खरेच किडींचे व्यवस्थापन करतो का? किंवा पाच टक्के निंबोळी अर्क कीड व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीने कार्य करतो

(१) पाच टक्के निंबोळी अर्क किडींना अंडी घालण्यास मज्जाव करून प्रतिबंधात्मक कार्य करतो : शेतकरी बंधूंनो पाच टक्के निंबोळी अर्क फवारणी केल्यानंतर तूर हरभरा कपाशी सोयाबीन या सारख्या पिकातील व व इतर पिकातील पतंग वर्गीय केली उदाहरणार्थ घाटे घाटेअळी लष्करी आली उंट आळी गुलाबी बोंड अळी किंवा रस शोषणाऱ्या किडी उदाहरणार्थ पांढरी माशी यासारख्या किडींना संबंधित पिकात अंडी घालण्यास प्रतिबंध करतो त्यामुळे अशा पिकावर संबंधित शत्रु किडीची संख्या किंवा प्रादुर्भाव कमी होतो. पाच टक्के निंबोळी अर्काची व्यतिरिक्त कडुनिंबाची वाळलेली पाने साठवलेल्या धान्यात टाकल्यास सुद्धा हा गुणधर्म कामात येऊन साठवलेल्या धान्यात किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

(२) पाच टक्के निंबोळी अर्काचा अंडी नाशक गुणधर्म: शेतकरी बंधूंनो एक तर निंबोळी अर्क फवारणी यामुळे पिकांवर वर निर्देशित केल्याप्रमाणे शत्रु किडी अंडी देणे टाळतात किंवा पाच टक्के निंबोळी अर्क हंड्यावर शत्रूच्या अंगावर पडल्यास 50% अंड्यातून किडी  बाहेर पडत नाही. म्हणजेच पाच टक्के निंबोळी अर्क अंडी नाशक  म्हणून काम करतो. उदाहरणार्थ सोयाबीन वरील तंबाखूची पाने खाणारी अळी किंवा तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी या व यासारख्या इतर किडी करता निंबोळी अर्कचा अंडी नाशक म्हणून फायदा होतो.

(३) पाच टक्के निंबोळी अर्काचा कीड परावर्तक गुणधर्म : शेतकरी बंधूंनो शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असे लक्षात आले आहे की निंबोळी अर्क खातील घटकामुळे निंबोळी अर्क फवारलेल्या पिकातून शत्रु कीडी लांब पळायला लागतात उदाहरणार्थ सोयाबीन वरील लष्करी अळी कपाशीतील व इतर पिकातील पांढरी इत्यादी. (४) पाच टक्के निंबोळी अर्काचा खाद्य प्रतिबंधक गुणधर्म: शेतकरी बंधूंनो बऱ्याच वेळा पिकावर पाच टक्के निंबोळी अर्क फवारल्यानंतर किडी जिवंत दिसतात परंतु त्या त्यांचे खाणे बंद करतात व उपाशी होऊन त्यांचे व्यवस्थापन मिळते उदाहरणार्थ पांढरी माशी उंट अळी इत्यादी.

(५) पाच टक्के निंबोळी अर्काचा कीड वाढ प्रतिरोधक गुणधर्म : शेतकरी बंधूंनो पाच टक्के निंबोळी निंबोळी अर्ककातील Azadirachtin हा घटक किडीची वाढ थांबवतो, किडींना कात टाकण्यास प्रतिबंध करतो. उदाहरणार्थ पांढरी माशी व तत्सम किडीचे व्यवस्थापन या गुणधर्मामुळे मिळते. 


शेतकरी बंधूंनो याव्यतिरिक्त कडुनिंबाच्या गरामध्ये मेथेनोलिक या रासायनिक घटकांमुळे तंबाखू वरील पाने खाणाऱ्या अळीचे  व्यवस्थापन मिळते. शेतकरी बंधूंनो पाच टक्के निंबोळी अर्क सरळ किडींना मारण्यासाठी नसून किडींना अंडी घालण्यास प्रतिबंध करणे किडींची अंडी नाश करणे किडींना लांब पळायला लावणे किडींची वाढ खुंटणे यासारख्या इतर रासायनिक कीटकनाशका मध्ये नसलेल्या गुणधर्माचा वापर करून एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्यासाठी आहे. विविध पिकातील सुमारे 400 ते 500 शत्रु किडीच्या प्रजाती तिच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्काचा प्रभावी वापर केल्या जाऊ शकतो.

(E) पिकांवरील रोगा करिता कडूलिंबा वर आधारित कीडनाशकाचा वापर : शेतकरी बंधूंनो पपई पिकावरील रिंग स्पॉट व्हायरस या या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा कीड व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबोळी अर्क तसेच निंबोळी तेलाचा शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यकतेनुसार वापर केला जाऊ शकतो.

शेतकरी बंधूंनो वर निर्देशित माहितीचा शास्त्रोक्त अभ्यास करून एकात्मिक व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून वनस्पतिजन्य कीटकनाशकांचा वापर या घटकांतर्गत आगामी खरीप हंगामात तसेच फळे भाजीपाला व फुले पिकात पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर करावयाचा आहे याचे नियोजन करून आताच निंबोळ्या उपलब्ध झाल्याबरोबर निंबोळ्या गोळा करून वाळवून साठवून ठेवा व गरजेनुसार विविध पिकात पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर वरून खर्च खर्च कमी करून पर्यावरण पूरक कीड व्यवस्थापन करा 

धन्यवाद 

            संकलक

राजेश डवरे  तांत्रिक समन्वयक कृषी महाविद्यालय रिसोड (करडा) तथा कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या