पपई पिकासाठी तणनियंत्रण
पपईच्या रोपांची पुनर्लागण केल्यानंतर बागेतील काही कामे प्रथमदर्शनी क्षुल्लक वाटली तरी भरघोस पीक येण्याच्या दृष्टीने त्याचे महत्व फार असते. बागेत गवत आणि झाडेझुडपे वाढल्यास ती पपईच्या झाडाशी स्पर्धा करुन जमिनीतील पोषणद्रव्ये ब-याच प्रमाणात शोषून घेतात. विशेषत : झाडे लहान असताना विस्ताराला अडथळा येऊन ती कायमची कमजोर बनतात. मुळ्यांना नीट हवा मिळू शकत नाही. त्यामुळे पाने पिवळी पडतात. शिवाय गळतात. ही हानी टाळण्य़ासाठी बागेतील गवत व झाडेझुडपे वारंवार काढून टाकण्याची काळजी घेतली पाहिजे. झाडे लावल्यानंतर १५-२० दिवसांनी निंदणी करावी. पपईच्या झाडाच्या मुळ्या जमिनीत उथळ वाढतात म्हणुन खोल आंतरमशागत कधीही करू नये.
आंतरमशागत हलकी व वारंवार करावी.
वर्षातून दोन वेळा उभी-आडवी हलकी नांगरणी व वखरणी करावी.
जमीन भुसभुशीत ठेवल्याने फळांची प्रत व उत्पादन सुधारते.
आळ्यातील गवत खुरप्याने निंदून घ्यावे.
पावसाळ्यात हिरवळीचे खत पीक पेरणे व तागाची पेरणी करुन फुलावर येण्याअगोदर जमिनीत गाडून टाकणे चांगले.
ठिबक सिंचन वापरल्यास तणे येण्याचे वाढीचे प्रमाण कमी असते.
तणनाशके वापरावयाची झाल्यास झाड १ मीटर उंच झाल्यावर ग्रामोक्झानसारखे स्पर्शजन्य तणनाशक २०० लिटर पाण्यात १ लिटर या प्रमाणात मिसळून साधे नोझल न वापरता डब्लूएफएन ७८ किंवा डब्लूएफएन ५६२ नोझल वापरून फवारा झाडांच्या कोणत्याही भागावर उटणार नाही, अशी दक्षता घेऊन फक्त तणांवर मारावा. यामुळे लव्हाळा, हरळीसारखी एकदल तणे आटोक्यात येतात.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro