शेतकऱ्यांसाठी अभिनव संकल्पना राबवून त्या यशस्वी करणाऱ्या सक्षम अधिकारी म्हणून नगर जिल्हा परिषदेत कार्यरत क्रांती रवींद्र चौधरी-मोरे यांनी नाव कमावले आहे. कोविड काळात सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्रीचे तयार केलेले प्रारूप राज्यभर गाजले आहे.
Nagar News : नगर जिल्हा परिषदेत (Nagar Zilha Parishad) कृषी अधिकारीपदी कार्यरत क्रांती रवींद्र चौधरी-मोरे यांनी स्वतंत्र ओळख तयार केली आहे. बायोगॅस विकास योजना, कार्यालयीन प्रशासन व्यवस्थेला मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
उदगीर तालुक्यातील (जि. लातूर) स्वातंत्र्यसेनानी मोहनअप्पा चौधरी यांच्या त्या नात. त्यामुळे आजोबांचे संस्कार व ग्रामीण विकासाची संकल्पना मनात खोलवर रुजलेली. मुलगी झाल्यास नाव क्रांती ठेवा अशी लेखी सूचनाच आजोबांची होती.
वडील डॉ. रवींद्र यांनी ती पाळली. त्यांनी ग्रामीण भागात निष्ठेने वैद्यकीय सेवा केली. क्रांती यांचा विवाह १९९८ मध्ये डॉ. सतीश मोरे यांच्याशी झाला. परभणी येथील कृषी विद्यापीठातून पदवी तर राहुरी येथील कृषी विद्यापीठातून जलसिंचन व्यवस्थापनात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.
सन २००३ मध्ये कृषी विस्तार अधिकारी म्हणून क्रांती नांदेड जिल्हा परिषदेत रुजू झाल्या. पेण, उरण, नगर आदी भागांत नोकरी केली. प्रत्येक ठिकाणी कामाचा ठसा उमटवला. सन २००९ मध्ये स्पर्धा परीक्षेद्वारे कृषी विभागात अधिकारी म्हणून त्या रुजू झाल्या.
कोविड काळातील प्रशंसनीय कार्य
सन २०१२ ते २०१९ पर्यंत उरण येथे महिला बचत गटांची बांधणी केली. सन २०२० मध्ये कोविडमध्ये उरण तालुक्यात लॉकडाउनमध्ये क्रांती यांनी शेतकरी आणि ग्रामीण महिलांचे व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार केले. त्यातून शहरी ग्राहकांना थेट शेतीमाल विक्रीचे प्रारूप विकसित केले.
त्याद्वारे कोविडच्या पहिल्या वर्षी नऊ लाखांची, तर २०२१ मध्ये ७० लाख रुपयांच्या आंब्याची विक्री झाली. शेतकऱ्यांनी २५ लाखांचा भाजीपालाही थेट विकला. त्यातून त्यांचा नफा वाढला. ग्राहकांनाही वाजवी किमतीत खात्रीशीर माल घरपोच मिळाला. पुढे विविध जिल्ह्यांतील शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत विक्रीसाठी येऊ लागला.
फार्म टू होम, होम टू फार्म, फॅमिली फार्मर आदी संकल्पना, विश्वासार्हता व पारदर्शकता ही सूत्री यशस्वी झाली. शासनाने या उपक्रमाला राज्यातील सर्वोत्कृष्ट नावीन्यपूर्ण बाब म्हणून गौरविले. या संकल्पनेचे नवी मुंबईत एक लाख ग्राहक तयार झाले. शेतकरी व बचत गट त्या माध्यमातून विक्री करीत आहेत.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro