Ticker

6/recent/ticker-posts

Kharif Sowing : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, राज्याच्या कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. काही दिवसांत पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा, असे सांगितले. लांबलेल्या पावसामुळे राज्यातील वरिष्ठ कृषी अधिकारी, सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरु यांची बैठक कृषिमंत्र्यांनी घेतली. त्यावेळी पेरणीबाबत घाई न करण्याचे आवाहन करण्यात आले.सध्या राज्याच्या काही भागात पेरणी झाली आहे. जून महिना अखेरीस पाऊस येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.त्यामुळे पाऊस आल्याशिवाय पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करु नये, यासाठी कृषि विभाग आणि कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी, अशा सूचना देण्यात आली आहे.


पेरणीसाठी जमिनीत किती ओल असली पाहिजे?

सध्या शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असून शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे.पाऊस न पडल्याने खरीप हंगामातील पेरणी रखडली आहे.शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.जमिनीत चांगली ओल निर्माण झाल्यासच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

दोन ते तीन दिवस सतत पाऊस पडल्यास आणि ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यास शेतकऱ्यांनी पेरणी करावी.कपाशीची पेरणी १५ जुलै नंतर चालत नाही.सोयाबीन, तुरीच्या पेरणीला थोडा उशीर चालू शकतो. पण, ज्यांना सोयाबीनची काढणी केल्यानंतर त्या जमिनीवर हरभरा पेरायचा आहे, त्यांना मात्र सोयाबीनची पेरणी करण्यासाठी उशीर चालत नाही.सामान्यपणे कपाशी सोडली तर जून संपेपर्यंत इतर सगळ्या पिकांच्या पेरण्या होणे आवश्यक आहे

.महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या शिफारसीनुसार खरीप हंगामात वेगवेगळ्या पिकांसाठी ७ जून ते १५ जुलैपर्यंत पेरणी करता येते. पण, बाजरीसारख्या पिकांच्या बाबतीत पेरणी १५ जुलैच्या पुढे गेल्यास उत्पादनात घट होऊ शकते. सोयाबीन, बाजरी, तूर या पिकांच्या बाबतीत पेरणी ७ जून ते १५ जुलैपर्यंत करता येते असे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील ग्रामीण कृषी हवामान सल्ला सेवा केंद्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रवी आंधळे यांनी सांगितले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या